खासगी रुग्णालयातील मुलगीही कोरोनामुक्त ; 19 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
औरंगाबाद । वार्ताहर
कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी चौदा दिवस पूर्ण करणार्या पाचजणांची प्राथमिक स्वॅब चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांची पंधराव्या दिवशीची दुसरी चाचणी शनिवारी (दि.18) घेतली. दुसर्यांदा केलेली ही कोविड 19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. यशस्वी व योग्य उपचारामुळे पाचजण कोरोनामुक्त झाले आहेत. या पाच कोरोनामुक्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त महिलेने मिनी घाटीत शनिवारी चिमुकलीस जन्म दिला. चिमुकलीचे स्वॅब नमुने लगेच तपासणीसाठी घेतले होते. शनिवारी, रात्री उशीरा ते प्रयोगशाळेतून निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे नवजात चिमुकलीस कोविड 19 चा संसर्ग नाही. माता आणि चिमुकलीला वेगळे ठेवलेले आहे. बाळाला आवश्यक असणारे मातेचे दूध र्निजंतुकीकरण करून देण्यात येत आहे. सध्या माता व बाळाची तब्येत ठीक आहे. आतापर्यंत औरंगाबादेतील तीन रुग्णांवर यशस्वी उपचार करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात अजून या पाच जणांचा समावेश झाल्याने औरंगाबादेतील एकूण आठ कोरोनाबाधित रूग्ण उपचारांती बरे होऊन घरी परतले आहेत.
सध्या मिनी घाटीत एकूण 23 रूग्ण कोविड विलगीकरण कक्षात उपचार घेत होते. परंतु त्यातील पाचजण कोरोनामुक्त झाल्याने ते घरी परतले. त्यामुळे आता मिनी घाटीत 18 आणि आज नव्याने एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण 19 रूग्णांवर कोविड विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज एकूण 46 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 29 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. काल आणि आजचे मिळून एकूण 64 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. अजून 17 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. सध्या मिनी घाटीत 44 रुग्ण देखरेखीखाली आहेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
खासगी रूग्णालयातील मुलगीही कोरोनामुक्त
खासगी रुग्णालयात चार एप्रिल रोजी दाखल झालेल्या सात वर्षीय मुलीची दुसरी कोविड 19 चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे ती कोरोनामुक्त झाली. खासगी रूग्णालयातून तिला शनिवारी रात्री उशीरा डिस्चार्ज दिल्याचे रूग्णालयाचे प्रशासक डॉ. हिमांशु गुप्ता यांनी सांगितले.
घाटीतील कोविड रुग्णालयात 22 रुग्ण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील कोविड रुग्णालयात दुपारी चार वाजेपर्यंत घाटीच्या कोविड रुग्णालयात 22 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी 17 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आलेले आहेत. तर पाच जणांचे स्वॅब येणे बाकी आहेत, असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
Leave a comment