अनेक महिन्यांपासून गायब घंटागाड्या अचानक गल्लीत दिसल्या; तात्पुरत्या 'शो'बाजीमुळे नागरिक संतापले
बीड | वार्ताहर
राजकारणात वजन असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (दादा) यांचा दौरा जाहीर होताच बीडमधील पालिका प्रशासन 'अचानक जागे' झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याने तुंबलेले रस्ते, गल्लीबोळ आणि बंद पडलेल्या सेवा अवघ्या काही तासांत कार्यरत झाल्या. मात्र, ही स्वच्छता नागरिकांसाठी नसून केवळ 'नेत्यांना दाखवण्यासाठी' होती, हे दौरा संपताच उघड झाले आहे. नागरिकांनी पालिकेच्या या ढोंगी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून ज्या घंटागाड्या गल्लीबोळातून गायब होत्या, त्या दादांच्या दौऱ्याची घोषणा होताच एका दिवसात दोनदा कचरा उचलण्यासाठी धावू लागल्या. एका संतप्त रहिवाशाने सांगितले, "गेले कित्येक महिने दुर्गंधीत राहिल्यानंतर अचानक एवढी नियमित सेवा मिळाली, पण हे नाटक होते." प्रशासनाला आपल्या कर्तव्याची आठवण फक्त नेते येणार म्हणून होते का, असा थेट प्रश्न स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे. कचरा वेळेवर न उचलल्याने निर्माण झालेली दुर्गंधी दादांच्या भेटीच्या तयारीत केवळ तात्पुरती दूर करण्यात आली.

अधिकाऱ्यांची धावपळ, फक्त 'शो' साठी खर्च
नगरपरिषद आणि स्वच्छता विभागाने 'स्वच्छता विशेष मोहीम' च्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून अवघ्या काही तासांत राबवलेला हा उपक्रम केवळ फसवणूक आहे. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, "अनेक महिने बंद असलेले प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे आदेश आले. ही कामे नियमित झाली तर कोणाला 'ओव्हरटाईम' करण्याची गरज पडणार नाही." रस्त्यांवर पांढऱ्या खडूरेषा मारणे, फूटपाथ रंगवणे, अतिक्रमण हटवणे—ही कामे केवळ 'पाहुण्यांसाठी' सुरू होती. "अशी कामे रोज झाली तर शहराचे स्वरूप बदलेल, पण ही तर केवळ दिखाव्याची कामे आहेत," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

दौरा संपला, 'स्वच्छता'ही थांबली
मागच्यावेळी अजित दादांचा दौरा संपताच, पालिकेचा स्वच्छता मोहीम पॅटर्न जसा सुरू झाला तसाच थांबला. एका व्यावसायिकाने सांगितले की, "दादा मागच्या वेळी येऊन गेल्यापासून घंटागाडी आली नाही. दोन दिवसांत रस्ते पुन्हा अस्ताव्यस्त झाले होते " याचा अर्थ, स्वच्छतेचा हा खेळ केवळ 'पत्रकारांचे कॅमेरे' आणि 'नेते येणार' या मोडवर चालतो. सहा महिन्यांनी पुन्हा नेता येणार मगच प्रशासन जागे होणार." पालिकेचा हा तात्पुरता 'स्वच्छता देखावा' आता नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडचा ठरला आहे.

नियमित व्यवस्थेची गरज
शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते, पालिका प्रशासनाचा हा 'राजकीय दौऱ्यावर आधारित' पॅटर्न कोणत्याही शहरासाठी धोकादायक आहे. स्वच्छता हा सतत चालणारा उपक्रम आहे. राजकीय दौऱ्यांवर आधारित अशी खंडित साफसफाई कोणताही दीर्घकालीन बदल घडवू शकत नाही. पालिकेने तात्पुरत्या दिखाव्याऐवजी नियमित कचरा व्यवस्थापन, अधिक कर्मचारी आणि योग्य उपकरणे देऊन ही सेवा नागरिकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करणे आवश्यक आहे. अन्यथा, हा जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचे सिद्ध होते
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment