नियमित रेल्वेसेवा सुरु होईना; बीडकरांनी आवाज उठविण्याची गरज
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील लोकांनी अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या अहिल्यानगर-बीड रेल्वे मार्गाचे काम मागील दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून, या मार्गावर रूळ अंथरण्याचे तसेच स्टेशन उभारणीचे काम जलद गतीने करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने चाचणीसुद्धा यशस्वीरीत्या पार पाडली आहे. मात्र, या सगळ्यानंतरही या मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सेवा सुरु करण्यात आलेली नाही, यामुळे जिल्हावासीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या मार्गावर काम पूर्ण होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्याप प्रवाशांसाठी रेल्वे सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे या मार्गावरील सेवा सुरू करण्याची मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वापरात नसलेल्या रूळांवर गंज चढण्याची भीती रेल्वेप्रेमी आणि तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दीर्घ काळापर्यंत वापर न झाल्यास रूळांच्या गुणवत्ता आणि सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक नागरिकक, व्यापारी वर्ग आणि विद्यार्थी यांना या मार्गाची अत्यंत गरज आहे. या रेल्वेसेवेच्या प्रारंभामुळे बीडचा नागपूर, औरंगाबाद, पुणे यांसारख्या शहरांशी थेट संपर्क सुकर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी आता केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात ठोस कार्यवाही कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बीड जिल्ह्याला अखेर रेल्वेची जोड मिळणार अशी आशा निर्माण झाली होती, कारण अहिल्यानगर-बीड रेल्वे मार्गाचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून, चाचणी देखील यशस्वीरीत्या पार पडली आहे. मात्र, अद्यापही या मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे बीडकरांमध्ये नाराजी असून, आता पावसाळ्यामुळे या रूळांवर जंग चढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हवेतील आर्द्रतेमुळे गंज लागण्याची शक्यता असते. रेल्वे तज्ञांच्या मते,येत्या काही दिवसांत जर या मार्गावरून नियमित गाडी चालवली गेली नाही, तर पावसामुळे रूळांना जंग लागण्याची शक्यता अधिक आहे. एकदा का रूळ जंगखोर (गंज)झाले, तर संपूर्ण पटरी काढून नवीन टाकावी लागते. त्याचबरोबर या प्रक्रियेस 2 ते 3 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. असाच धक्कादायक प्रकार कर्नाटकातील होसपेट-हरिहर/दावणगिरी मार्गावर घडला होता. तिथे देखील रूळ अंथरले गेले, पण काही वादांमुळे 7-8 महिने रेल्वे सुरु झाली नाही. त्यात पावसामुळे रूळ खराब झाले, आणि अखेर प्रशासनाला संपूर्ण पटरी बदलावी लागली. परिणामी, त्या मार्गावर रेल्वे सुरु होण्यासाठी तब्बल 4-5 वर्षे लागली. हेच आता बीडच्या बाबतीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतक्या प्रतीक्षेनंतर बीडकरांना रेल्वे मार्ग मिळाला, पण अजूनही गाडी धावत नाही, हे खरोखरच दुर्दैवाचे आहे. रेल्वेबाबत आणखीन किती अन्याय बीडकरांवर चालणार आहेत?बीडच्या जनतेने आता तरी आवाज उठवायला हवा. प्रशासनाने तात्काळ या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरु करावी, अन्यथा बीडकरांना पुन्हा दोन-तीन वर्षं वाट पाहावी लागेल आणि हा अन्याय आहे अशी खंत मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष अरुण मेघराज यांनी व्यक्त केली आहे.
Leave a comment