अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या छत्रपती संभाजी नगर येथील 17 व्या शाखेचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर \ प्रतिनिधी
अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ही मागील २८ वर्षांपासून ग्राहकांची विश्वासार्हता जोपासत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले आहे. ते छत्रपती संभाजी नगर येथे अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या १७ व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, संभाजीनगरचे आमदार प्रदीप जैस्वाल, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, भाजप च्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, संभाजी नगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील तर शहराध्यक्ष अभिजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण,अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी तसेच बँकेचे सर्व संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बँकेच्या नूतन शाखेच्या वास्तूची फीत कापून व अंबाजोगाईची ग्रामदेवता माता योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली देखील यावेळी अर्पण करण्यात आली. त्यांच्या या दुःखद निधनामुळे अजितदादा यांनी कुठलाही सत्कार न स्वीकारता केवळ स्मृतिचिन्हाचा स्वीकार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात मोदी यांनी बँकेबाबत संपूर्ण माहिती सांगितली. मागील अठ्ठावीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९६ साली केवळ दहा लाखाच्या भांडवलावर सुरू केलेल्या बँकेने आज पाचशे कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडला असंल्याचे याप्रसंगी मोदी यांनी अभिमानाने नमूद केले. बॅक आज राज्यातील आठ जिल्ह्यात आपल्या १७ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवीत आहे. काळाच्या ओघाप्रमाणे बँक विविध तांत्रिक सुविधा देखील ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.ज्यामध्ये ATM सुविधा असेल किंवा RTGS सुविधा ,लॉकर यासह अनेक सुविधा अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक ग्राहकांना पुरवीत असल्याचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्पस्ट केले. अर्थकारणासोबतच बँक वेळोवेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. ग्राहकांचा विश्वास हीच खरी बँकेची पुंजी असल्याचे मोदी यांनी आवर्जून उल्लेखित केले. उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार यांचेदेखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असून यापुढेही त्याचे सहकार्य लाभत राहील अशी अपेक्षा याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकात राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली.
पिपल्स बँकेच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी व त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाने अभिनंदन व कौतुक करताना सतराव्या शाखेसाठी शुभेच्छा दिल्या. आजही असंख्य ग्राहक राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत .मोदी व त्यांचे संपूर्ण सहकारी देखील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरताना दिसत असल्याचे अजितदादा पवार म्हणाले. राजकिशोर मोदी यांच्या सारखी माणसं आपल्या सोबत असावीत अशी माझी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती मात्र ती इच्छा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यामुळे पूर्ण होत नव्हती.कारण मोदी व देशमुख यांचे पक्षाच्या व राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मागच्या दोन वर्षापूर्वी राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले व आपली ती इच्छा पूर्ण झाल्याचे नामदार अजितदादा पवार यांनी बोलून दाखवले.पुढे बोलताना नामदार अजितदादा म्हणाले की कुठल्याही संस्थेकडे संपूर्ण संचालक मंडळाचे बारीक लक्ष असणे गरजेचे असते . त्याकडे दुर्लक्ष झाल्यास ती संस्था रसातळाला जायला वेळ लागणार नाही असे स्पष्ट वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले.
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजी नगर येथे अंबाजोगाई पिपल्स बँकेची तिसरी शाखा सुरू करून राजकिशोर मोदी यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक केले. आर बी आय च्या नियम व निकषात बसूनच ही बँक आपली वाटचाल करीत असल्याने या बँकेस यश मिळत असल्याचे ना पवार यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री मा. ना. अमित शाह यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व सहकारी बँक तथा पतसंस्था या योग्य पध्दतीने चालविण्यासाठी प्रयत्न केले जात असून यात आपणास यश मिळत असल्याचे याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी नमूद केले. कर्ज पुरवठा करतांना योग्यता व पात्रता तपासूनच ते वितरित केले तर ते विना अडचण परत येण्यास मदत होते. तसेच ग्राहकांनी देखील कुठल्याही आमिषाला बळी न जाता योग्य त्या संस्थेतच आपण गुंतवणूक करण्याचा सल्ला अजितदादा पवार यांनी दिला. अंबाजोगाई पिपल्स बँकांच्या पाठीमागे आपण नेहमी खंबीरपणे सोबत राहाऊ असे अभिवचन याप्रसंगी अजितदादा यांनी दिले. त्याचबरोबर अंबाजोगाई नगर परिषद गेली २५ वर्षे राजकिशोर मोदी यांनी अतिशय सक्षम पणे संभाळली. अंबाजोगाई शहराचा कायापालट करण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. नगराध्यक्ष असतांना देखील त्यांना आपण सहकार्याचीच भावना ठेवून मदत केली आहे. यापुढेही त्यांना अंबाजोगाई नगर परिषदेसाठी कसलीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली. तर शेवटी संकेत राजकिशोर मोदी यांची देखील अजितदादा यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करत ते चालवीत असलेल्या विविध शैक्षणिक संस्था बाबत संकेत मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला. त्यांनी देखील अंबाजोगाई पिपल्स बँकेस शुभेच्छा देतांना गेली २८ वर्षांपूर्वी मोदी यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असल्याबाबत राजकिशोर मोदी यांचे अभिनंदन व कौतुक केले. बँकेच्या सर्व खातेदार, ठेवीदार व सभासदांनी विश्वास ठेवला म्हणून हे यश बँकेस मिळाले आहे. आज राष्ट्रकृत बँका शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करतांना दिसून येत आहेत मात्र अशाही परिस्थितीत सहकारी बँका सामान्यांच्या अपेक्षावर खऱ्या उतरत असल्याचे आवर्जून उल्लेखित केले. राजकिशोर मोदी व त्यांचे सर्व सहकारी चांगले काम करीत असून यापुढेही बँक ५०० वरून १०००कोटींचा टप्पा नक्कीच गाठेल अशी सदिच्छा व्यक्त केली.या शुभारंभ प्रसंगी बँकेचे असंख्य ग्राहक, ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीमती अपर्णा अध्यापक यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार ऍड विष्णुपंत सोळंके यांनी व्यक्त केले.
Leave a comment