संस्थेच्या दोन शाळां सीबीएसई मान्यताप्राप्त झाल्याने गुरुकुलचा लौकिक वाढला!
बीड | वार्ताहर
बीड येथील प्रतिथयश सावित्रीबाई फुले महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुरुकुल पब्लिक स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली द्वारा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.गुरुकुल इंग्लिश स्कूल नंतर नव्याने सुरु झालेल्या गुरुकुल पब्लिक स्कूलला सीबीएसई मान्यताप्राप्त झाल्याने संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असुन बीडच्या शैक्षणिक पटलावर गुरुकुलची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आधुनिक शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शाळा उभारण्याचा मनोदय संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केला.
बीड बायपासवर नव्याने उभारलेल्या गुरुकूल पब्लिक स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्लीने सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमाला अधिकृत प्रशासकीय मान्यता दिली असुन याबाबतचे पत्र नुकतेच संस्थेला प्राप्त झाले आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन शाळा सीबीएसई बोर्ड संलग्न झाल्याने संस्थेचा गुणवत्तेचा स्तर आणखीन वाढण्यास मदत होणार आहे. नुकतीच केंद्रीय पथकाकडुन या शाळेच्या गुणवत्तावर्धक सर्व शिक्षण सुविधाची तपासणी करण्यात आली होती. गुरुकुल पब्लिक स्कूल ची भव्य इमारत जालना रोड बीड बायपासवर सर्वांचे लक्ष वेधून घेते. आधुनिक व सर्व शैक्षणिक भौतिक सुविधा याठिकाणी संस्थेने उपलब्ध करून दिल्याने अल्पावधित हा शाळेने मोठी झेप घेतली आहे. बीडच्या पालकांनी या शाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याने हे यश मिळाल्याचे डॉ. राजेंद्र ढाकणे यांनी सांगितले. पुढे बोलतांना याशाळेला सीबीएसई बोर्ड ची मान्यता मिळाल्याने संस्थेची जबाबदारी आणखीन वाढली आहे. गेवराई तालुक्यात उक्कडपिंपरी येथे ही चालू शैक्षणिक वर्षांपासून कर्मयोगी डॉ.नारायणराव ढाकणे इंग्लिश स्कूलची सुरुवात करून ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षणाची मुहूर्तमेढ रॊवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. नारायणराव ढाकणे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे , संस्थेचे कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे,डॉ.पुष्कर ढाकणे, डॉ. सौ. ऋतुजा ढाकणे, प्राचार्या ऋतुजा गाडीवान तसेच गुरुकुल परिवारातील सर्व शिक्षक कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment