औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनावरील नियंत्रणासाठी व भविष्यातील त्याचा प्रसार रोखण्यासाठी विभागातील सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात समन्वय आणि योग्य खबरदारी घेत नागरिकांमधील या रोगाबद्यलची अनावश्यक भीती घालवावी. तसेच कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जनजागृती करीत प्रत्यक्ष व सतत संवाद साधावा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूवर नियंत्रण व उपाययोजना या संबधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी व संबधित प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेंकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगर पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, अप्पर विभागीय आयुक्त शिवांनद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी,मनपाच्या आरोग्यअधिकारी निता पाडळकर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री. केंद्रेकर यांनी आठही जिल्हयात कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व यंत्रणांनी शासन आणि खउचठ च्या निर्देशाप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, कोरोना रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी त्या-त्या जिल्हयाच्या यशस्वी झालेल्या पध्दतीचा अवलंब करावा,अशी सुचना केली. जेणेकरून विभागातील रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवणे सोपे होईल. तसेच श्री. केंद्रेकर यांनी बाजारपेठांतील दुकानांमध्ये दुकानमालक, ग्राहकांनी सॅनिटायझर वापरणे , टेंपरेचर तपासणे पुढील काळासाठी बंधनकारक करण्याचे, नागरिकांनी सेल्फ चेकिंग करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहभागाद्वारे जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांनी समन्वय व योग्य खबरदारी राखत रुग्णांशी संवाद साधत त्यांचे मानसिक मनोबल वाढवणे, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलभुत सुविधा अधिकाअधिक उपलब्ध करुन सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही श्री. केंद्रेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मोठया प्रमाणात संशयीतांची स्वब तपासण्याचे प्रमाण वाढविणे व वेळेत परिणाम प्राप्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शहरातील धुत, एमजीएम, कमलनयन बजाज, डॉ. हेडगेवार या रुग्णालयातील काही कक्षात कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येत असल्याचे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त असल्याची माहिती दिली.
मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी सांगितले की, शासन निर्देशाप्रमाणे वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. झोपडपट्टया, दाट लोकवस्ती असणार्या भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने तातडीने तो भाग प्रतिबंधीत करुन संशयीताना क्वारंटाईन केले गेले. यासाठी टॉवर लोकेशन,कॉन्टॅक्ट मॅपिंग खुप महत्वाचे झाले आहे. ज्यात संशयीतांच्या घरोघरी जाऊन लाळेचे नमुने घेतले, क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले याकरीता स्मार्ट सिटी बसचा वापर करण्यात आला. काही संशयीतांना सक्तीने होमक्वारंटाईन करण्यात आले व प्रशासकीय अधिकार्यांच्या कंट्रोलींग टिमद्वारे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आल्याने कन्टेमेंट झोनमध्ये रोगाचा प्रसार होण्यास आळा बसल्याचे सांगितले. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी सहकार्य घेण्यात आले. तसेच माझा वार्ड कोरोनामुक्त वार्ड मोहिम, (माझी हेल्थ माझ्या हाती) या मोबाईल अॅपद्वारे नांगरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहितीही श्री.पांडेय यांनी यावेळी दिली.
Leave a comment