औरंगाबाद । वार्ताहर
मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन पावसाळ्यात उद्भवणार्या समस्यांची तातडीने सोडवणूक करणे शक्य होईल. यासाठीचे सर्वसमावेशक पूर्वनियेाजन करुन सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मान्सून पूर्वतयारी बाबतची बैठक विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, उपायुक्त (सा. प्र.) वर्षा ठाकूर, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) गणेश गावडे, पोलीस उपायुक्त (शहर) मीना मकवाना, विभागीय कृषी सहसंचालक उदय देवळणकर, तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सिंचन, पाटबंधारे व इतर संबंधित यंत्रणांचे प्रमुख व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी पावसाळ्यात प्रामुख्याने नदी काठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे असून त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी काठच्या 1572 गावांमध्ये प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी. या ठिकाणांसह ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अति पर्जन्यमानाची शक्यता आहे, तसेच गेल्या वर्षांत ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणची गावे स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, शाळा, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावी. त्या जागी पिण्याचे पाणी, जेवणाची योग्य व्यवस्था राहील याची काळजी घेण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या, काठावरची गावे या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्याठिकाणी तातडीने ती दुरुती कामे पूर्ण करुन घ्यावी. धोकादायक तलाव, पाझर तलाव तसेच धरणे आहेत तिथे 24 तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. महावितरणने विद्युत खांब, विद्युत प्रवाह करणार्या तारा, या सुव्यवस्थित आहेत का, पावसाच्या, वादळाच्या स्थितीत त्या धोकादायक बनणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व पूल, रस्ते इमारती यांची पाहणी करुन घ्यावी. लाईफ जॅकेट, बोटी व इतर अनुषंगिक उपाययोजना सज्ज ठेवावी.
औरंगाबादच्या खामनदीच्या पात्राची पाहणी करुन आवश्यक असल्यास तेथील लोकांचे तात्पुरते सुरक्षित स्थलांतर प्राधान्याने करावे. पावसाच्या पाण्यात रस्ता, पूल वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे, बीड जिल्ह्यात बिंदूसारा व इतर सखोल पात्र असणार्या नद्यांची पाहणी करुन अति पर्जन्यमानात उद्भवणार्या संकंटांच्या व्यवस्थापणाची पूर्वतयारी ठेवावी. आपतकालीन यंत्रणांची दुरध्वनी सेवा सुरु करावी, नोडल अधिकारी नियुक्त करावेत. नदीकाठच्या, धरणाजवळच्या गावांमध्ये सरपंचाची बैठक घेऊन नियंत्रण व्यवस्थापन सज्ज ठेवावे. वीज पडणे या घटनांमूळे होणारे नूकसान लक्षात घेऊन वीज पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, आपत्तीच्या वेळी उपयोगात येणारी खात्याची विविध उपकरणे, यंत्रे सुस्थितीत आहे याची खात्री करुन घ्यावी. वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वीत व सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले.
सर्व गावांमध्ये पोहोचणारे रस्ते किंवा पर्यायी रस्ते ज्यामध्ये पूल, रेल्वे क्रॉसिंग इत्यादी अंतर्भूत आहेत त्यांची स्थिती तपासून घ्यावी. तात्पुरत्या निवार्यासाठी पर्यायी जागांची निश्चिती करुन ठेवावी. त्याठिकाणी विद्युत, पाणी, स्वच्छतागृहे यांची सोय करावी. प्रमुख नद्यावरील पुलासह इतर पुलांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन काही दुरुस्ती असल्यास ती तात्काळ करावी. पुल दुरस्तीचे वेळी वळण रस्त्याच्या ठिकाणी फलक लावावा. धरणात येणार्या पाण्याची आवक, पाणीपातळी, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे सनियंत्रण करावे व याबाबत जिल्हा प्रशासनास वेळोवेळी अवगत करावे. पाणी साठी, धरण सुरक्षा, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाची उपाययोजना याबाबत आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष व नागरिकांना त्वरित सूचना द्याव्यात, अशा सूचना श्री. केंद्रेकर यांनी संबंधितांना दिल्यात. यावेळी सहायक आयुक्त (महसूल) एस.पी. सावरगावकर, तहसीलदार (महसूल) नरेंद्र कुलकर्णी, मुख्य अभियंता (कडा) दिलीप तवर, आरटीओ कार्यालयाचे एस.जे. सदामते, शहर अभियंता(मनपा) सखाराम पानझडे, एपीआय विरायनी कदम, मुख्य अभियंता (चडएऊउङ) एस. एल .गणेशकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.मिलिंद देशमुख, आकाशवाणीचे उन्मेष वाळिंबे यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.
Leave a comment