पोलीस व प्रशासनाला कोरोना रोखण्यासाठी तारेवरची कसरत
औरंगाबाद । संजय हिंगोलीकर
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्यामुळे संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत आहे. तसेच अशी गर्दी जर होत राहिली तर कोरोनाचा प्रसार कसा रोखणार हा मोठा प्रश्न असून खरोखरच संचारबंदी लागू आहे असा प्रश्न ही गर्दी पाहिल्यावर पडतो. त्यामुळे प्रशासनाने गर्दी करून नियम मोडणार्यांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. पंतप्रधानांपासून ते गाव पातळीवर सर्वच जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मात्र बर्याच ठिकाणी लोक काही ऐकायला तयार नाहीत. सोशल डिस्टन्ससिंगची (सामाजिक अंतर) तर त्यांनी ऐसी की तैसी करून ठेवली आहे. असाच प्रकार शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकान व भाजीपाला मार्केट मध्ये पाहायला मिळाला. भारत सरकारच्या गरीब कल्याण पॅकेजनुसार महिलांच्या जनधन बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे. जनधन खात्यावरील हे पैसे काढण्यासाठी आज बँकांत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात विशेषतः महिलांच्या गर्दीने तर संचारबंदीतही गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक केल्याचे पहावयास मिळत होते.
सर्वच जनधन खात्यात 500 रूपये जमा झाले असून खातेदार पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आज जिल्ह्यातील बहुतांश बँकांसमोर दिसून आले. शहरातील एसबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेंन्ट्रल बँक, युको बँक, सिंडीकेट बँक यासह इतर बँकासमोर ग्राहकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. बँकेत एकावेळी आतमध्ये मोजक्याच ग्राहकांना सोडण्यात येत होते. मात्र बँकेबाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते. त्यांना ना कोरोनाची भीती ना चिंता होती. त्यात बँकेच्या नियमित ग्राहकांपेक्षाही जनधन खात्यामध्ये आलेली रक्कम काढणार्यांची भर पडली होती. यामुळे सोशल डिस्टन्सींग ठेवणे गरजेचे असतानाही हा नियम कोणीच पाळला नाही. जनधन खात्यात केंद्र सरकारतर्फे पैसे जमा करण्यात आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी प्रत्येक खातेदारांना वेगवेगळी तारखा देण्यात आले आहे. असे असतानाही महिला बँकांमध्ये गर्दी करत आहेत. यामुळे बँकांमध्येही कर्मचार्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. लॉक डाऊन असल्यामुळे बँकांमध्ये गर्दी करु नयेत, एका वेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं नियम आहे मात्र ग्राहक गर्दी करून हा नियम तोडत आहेत आता ही होणारी गर्दी कोरोनाला खत पाणी घालत आहे शहरातील व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यात पोलीस व प्रशासनाच्या आता मोठी कसरत करावी लागणार यात काही शंका नाही.
Leave a comment