औरंगाबाद । वार्ताहर
मागील दिड वर्षांपासून सोयगाव तालुक्यातील वरठाण गावाला पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी दुसर्या गावावर व खाजगी लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. गावाला धरण व विहिरीतून थेट पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे नळाला येणारे पाणी पिण्या योग्य नसून अतिशय गढूळ व दूषित होते. दूषित पाण्यामुळे स्थानिक शेतकर्यांना व गावकर्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असे त्यातच कोरोनाने भर टाकली. लॉकडाऊनमुळे पाण्याचा विषय अतिशय गँभीर व जिव्हाळ्याचा बनला होता.
वरठान गावातील शेतकरी व गावकर्यांनी याची तक्रार थेट खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली. सदरील तक्रारीची खासदार जलील यांनी गँभीर दखल घेऊन स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या कि तात्काळ नळ जोडणी करून पाणी फिल्टर लावण्यात यावे. सरपंच, ग्रामसेवक व गावकर्यांच्या उपस्थितीत नळ जोडणी व पाणी फिल्टर बसविण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले. खासदार यांनी विशेष लक्ष देऊन योग्य सूचना केल्यामुळे अखेर गावातील 2500 च्या वर गावकर्यांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता वरठाण गावाला प्रत्येक तीन ते चार दिवसाला शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असून सदरील पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेविका पवार, शेख रईस उर्फ आखिर दादा व स्थानिक लोकांनी विशेष मेहनत घेतली. गावकर्यांचा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे गावकरी आनंदित झाले आहेत.
Leave a comment