गंगापुर । वार्ताहर
श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथील वनस्पतिशास्त्र विभाग व व बी. व्होक.- सस्टेनेबला अग्रिकल्चर विभागामार्फत दिनांक 18 मे 2020 रोजी विषाणूशास्त्र व कोरोना या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे (वेबीनार) आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये या विषयातील राष्ट्रीय पातळीवरील विषय तज्ञ व डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. या वेबिनार च्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय होमिओपॅथी परिषद, नवी दिल्ली चे सदस्य व औरंगाबाद येथील नामांकित होमिओपॅथी तज्ञ डॉ. पी. वाय. कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. प्रकाश पापडीवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक हे उपस्थित होते. या वेबिनार मध्ये परराज्यातील जास्तीत जास्त प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या वेबिनार मध्ये बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी अर्सेनिक अल्बम-30 व कँफोरा च1 या दोन होमिओपॅथिक औषधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की या औषधांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो. डॉ. पापडीवाल यांनी आपल्या भाषणात विषाणूशास्त्र व कोरोना याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक यांनी पाश्चात्त्य देशात व भारतामधील संशोधक कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लस तयार करण्यासाठी काम करत असल्याबाबतची माहिती दिली. ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या तयार केलेल्या लसीचे यशस्वी चाचण्या घेण्यात येत असल्याबद्दल सांगितले. कोरोना मुळे उद्भवलेल्या या कठीण प्रसंगी आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्यामुळे मानसिक तणाव येत आहे. तरी सर्वांनी अशा प्रसंगी संयम दाखवणे आवश्यकता असल्याचे सांगितले. वेबिनारच्या पहिल्या सत्रामध्ये नांदेड येथील कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे संचालक डॉ. गजानन झोरे यांनी कोरोना विषाणू विषयी व कोरोना निदान चाचणी विषयी सविस्तर माहिती दिली. कोरोनाचे लवकर निदान करण्यासाठी काय काय नियोजन केले जाऊ शकते व त्याचे महत्त्व काय याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. अरविंद धाबे यांनी कोरोना विरोधात लढताना औषधी वनस्पतींचे अनन्य साधारण महत्व पटवून दिले. गुळवेल, आवळा, बदाम, अश्वगंधा, तुळस, हळद, अद्रक, शिलाजित, केशर इत्यादींसारख्या औषधी वनस्पतींचे रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो याची शास्त्रीय माहिती दिली. वेबिनार च्या पुढच्या सत्रामध्ये हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाच्या सेंटर फॉर न्युरल अँड कॉग्निटिव्ह सायन्स विभागाचे डॉ. आकाश गौतम यांनी कोरोना विषाणू हा सर्वात जास्त सांसर्गिक का आहे या विषयावर तंत्रशुद्ध भाष्य केले. वेबिनार च्या शेवटच्या सत्रामध्ये उत्तर ओरिसा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे डॉ. संतोष कुमार साहू यांनी कोरोना विषाणूच्या आण्विक संरचनेबद्दल व त्याचा संसर्ग करण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर वैज्ञानिक आराखडा समोर ठेवला. या चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. वैशाली बागुल, प्रा. विशाल साबणे, वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रविकिरण सावंत, डॉ. सुधीर सोळंके श्री अतुल घुले आदींनी परिश्रम घेतले.
Leave a comment