उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साक्षी कांबळेच्या आईला फोनवरून दिला विश्वास
बीड | वार्ताहर
छेडछाडीला कंटाळून बीडमधील साक्षी कांबळे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तिच्या मामाच्या घरी धाराशिव येथे गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.दरम्यान
या घटनेच्या एक महिन्यानंतरही साक्षीचे कुटूंब न्यायाच्या प्रतीक्षेत असून साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून सोमवारी (दि.२१) त्यांनी साक्षी कांबळेच्या आईशी मोबाईलवरून चर्चा करत शासन या प्रकरणातील एकही दोषीला सोडणार नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्व जण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास दिला.तसेच साक्षीच्या आईच्या विनंतीनुसार धाराशिव येथून हा गुन्हा बीडला वर्ग केला जाईल.आरोपीला सहकार्य कारणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, ज्यांना जामीन मिळाला आहे त्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपिल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.
बीड शहरातील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या विद्यार्थिनीने धाराशिव येथे मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी यांच्या आईने घडलेली सर्व कैफियत मांडली होती. त्यानंतर या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले. सोमवारी एकनाथ शिंदे यांनी साक्षीच्या आईशी मोबाईलवरून संवाद साधला. 'तुम्ही काळजी करू नका. या प्रकरणाशी संबंधित कोणालाही सोडणार नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. यासंदर्भात मी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच बीड आणि धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांची चर्चा केली आहे. त्यांना योग्य त्या सूचना केल्या असून धाराशिव येथील गुन्हा बीडमध्ये वर्ग करण्यात येईल' असा शब्द एकनाथ शिंदे यांनी साक्षीच्या आईला दिला.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, या सर्व प्रकरणाची माहिती मी घेतली आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. ज्या आरोपीचा जामीन झालेला आहे, तो जामीन रद्द व्हावा यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आरोपी मुलाची बहीण रेल्वे पोलीस दलात असून तिने या प्रकरणात मयत साक्षी हिला अनेक वेळा दमदाटी केलेली आहे मात्र तिच्यावर अद्याप पर्यंत कसलीच कारवाई झालेली नाही, ही बाब साक्षीच्या आईने शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर शिंदे यांनी या प्रकरणात जे कोणी लोक असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मग ते कोणीही असो, कोणालाही माफी नाही असा शब्द त्यांनी दिला. साक्षी तुमची भाच्ची आहे. तुम्हीच तिला न्याय मिळवून द्या अशी विनवणी साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्र्यांकडे केली, त्यावर आम्ही तुमच्या सोबत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा शिवसेनेच्या संपर्कप्रमुख संगीता चव्हाण यांनी सोमवारी मयत साक्षी कांबळे यांच्या आईची भेट घेतली.यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले.
Leave a comment