विघ्नहर्ता मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम
बीड | वार्ताहर
उन्हाळ्याच्या कडक तापमानात आकाशात उडणारे पक्षी तहानलेले असतात. झाडांच्या सावलीतही त्यांना विसावा मिळत नाही. अशा परिस्थितीत बीड शहरातीलविघ्नहर्ता मित्र मंडळाने "एक वाटी पाणी, एक संजीवनी" हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
आजूबाजूच्या शहरात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. म्हणूनच घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे आवाहन विघ्नहर्ता मित्र मंडळाकडून करण्यात येत आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. अशातच अवकाळी पावसाने काही जिल्ह्यात हजेरी लावल्याने तापमानात चढउतार दिसून येत आहे. उन्हाळ्यात ठराविक वेळेनंतर थंड पाणी पिऊन आपण स्वत:ला उन्हापासून वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काहीसे प्राणी-पक्ष्यांचेही आहे. त्यांनाही पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी अनेक प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होतो. निसर्गाच्या साखळीमध्ये प्राणी-पक्ष्यांना देखील सर्वाधिक महत्त्व आहे. यासाठी एक जबाबदार नागरिक, सामाजिक भान, माणुसकी म्हणून आपण प्राणी-पक्ष्यांसाठी, त्यांची तहान भागवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात तळमळीने प्रयत्न केले पाहिजे. अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आज पुढे येऊन काम करत असून आपण देखील घराच्या खिडकीत, अंगणात, इमारतीच्या गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे.
विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ म्हणून राबवला असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.चला... आपण तरी त्यांच्या साठी एक वाटी पाणी ठेवूया या संदेशासह मंडळाने जनजागृती केली आहे.
Leave a comment