औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती झाली असून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. सध्या औरंगाबाद शहरातील कोवीड रुग्णांची वाढती संख्या पाहता या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी शहरातील खाजगी रुग्णालयांच्या नामांकित तज्ञ डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत डॉक्टारांनी कुठलाही मोबदला न घेता नि:स्वार्थ भावनेने कोवीड रुग्णांना सेवा देऊ, असे सांगितले.
औरंगाबाद जिल्हयातील कोविड-19 संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या वैदयकीय सल्लागारांच्या टास्क फोर्स व इतर अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, शासकीय वैदयकीय महाविदलयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा ठाकुर, उपजिल्हाधिकारी रिता मेहत्रेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या वैदकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घाटीच्या औषधी विभागाच्या डॉ. मिनाक्षी भटटाचार्य आदीसह इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संदीप व्यवहारे, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. तहीब, डॉ. जयंत बरीदे, डॉ. जगनाथ दिक्षित, डॉ. श्रीकांत सहस्त्रबुध्दे, डॉ. समद पटेल आदींसह विविध खाजगी रुग्णालयांचे नामांकित डॉक्टर उपस्थित होते. शहरातील कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित रुग्णांवर उपचाराकरीता खाजगी डॉक्टरांचे सहकार्य घेण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागील आठवडयात घेतलेल्या बैठकीत वैदयकीय सल्लागारांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या आज पार पडलेल्या बैठकीत कोविड रुग्णांना वाचविण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली.
कोविड रुग्णांना वाचविण्यासाठी सूचना करताना विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले की, खाजगी डॉक्टरांनी वार निहाय शहरातील कोविड उपचार केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची पाहणी करावी व योग्य त्या उपचाराबाबत मार्गदर्शन करावे. उपचाराच्या सल्यासाठी डॉक्टरांचे सोशल मिडियावर ग्रुपही बनवावे. तसेच भविष्यात टेलीमेडीसीनची पध्दत सुरु करावी. या उपक्रमासाठी खाजगी डॉक्टरांना प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. दरम्यान, बैठकीत उपस्थित सर्व खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टारांनी कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाला विनामोबादला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, कोवीड रुग्णांच्या मृत्यूदरात घट करण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सने रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता आपणास वेळोवेळी फीडबॅक दयावा, जेणेकरुन तात्काळ उपाययोजना अमलात आणता येतील. यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
Leave a comment