सिल्लोड । वार्ताहर
खरीप हंगामाचे दिवस जवळ आले आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकर्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. पुढील खरीप हंगामात शेतकर्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये व तसेच शेतकर्यांच्या इतर समस्यांच्या निवारणासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदार संघात दौरा करून विविध गावांतील शेतकर्यांची भेट घेत संवाद साधला. या दरम्यान ना. अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावकर्यांना सतर्क राहून खबरदारी घ्यावी, मतदार संघात डॉक्टर आपल्या दारी अभियान सुरू असून सर्वांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, राज्य सरकारने शेतकर्यांना कृषी निविष्ठा बांधावर देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, कृषी केंद्र चालक चढ्या भावाने विक्री करीत असल्यास त्यांची उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी शेतकर्यांना केले.
कोरोना संकटामुळे देशातील अर्थ चक्र संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी आता शेती सोबत दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन, शेळी पालन यासोबत पारंपरिक व उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीतून शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले तर शेती हा खरे तर आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु ग्रामीण भागातील तरुण आज शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. वास्तविक शेतीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता आहे, तसेच नियोजनबद्ध व आधुनिक तंत्राचा वापर करून बाजारपेठेचा कानोसा घेऊन शेती केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. विशेषत: शहराजवळच्या भागातील लोकांनी जर भाजीपाला, फुले, धान्य, पिके घेतली तर त्यांना मोठा आर्थिक नफा मिळू शकतो असे ना. अब्दुल सत्तार शेतकर्यांशी बोलतांना स्पष्ट केले.
Leave a comment