औरंगाबाद । उमेश पठाडे
कोरोनाचे संकट सुरु झाले आणि सरकारने लॉकडाउनचे राउंड सुरू केले, दुकाने बंद राहू लागले. पुढे जगण्यासाठी अन्नधान्य मिळेल की नाही याची भिती मनात निर्माण झाली आणि किराणा दुकानांवर लोकांची झुंबड उडू लागल्या. जिवनावश्यक वस्तूंसाठी लोक दुकांनावर गर्दी करत आहेत हे एकवेळ समजू शकतो पण सध्या शहरातील,गावातल्या दुकांनामध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गायछाप आहे का? आणि ती मिळावी यासाठी दुकानदारांना केली जाणारी विनवणी. सरकारने कोरोना काळात तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली आणि तिथपासून सूरू झाला साठेबाजार आणि अवास्तव दराने छुप्या मार्गाने विक्रीचा प्रवास. पहिल्या टप्यात लॉकडाऊन असताना आणखी ते वाढेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. त्या पहील्या टप्यात 10 रुपयाच्या पुडी 15 ते 20 ने विकली जात होती. जसजसे लॉकडाउन वाढले तसे पुडीचा दर अगदी पन्नासच्या पुढे गेला आहे तरी सुद्धा तलपविरांना या कीमतीत तंबाखु खरेदी करायला काही संकोच वाटत नाही. तलप भागविण्यासाठी अनेकजन अगदी दुसर्या गावात तर सोडा अगदी दुसर्या तालुक्यात देखील पुडीचा शोध घेत असल्याचा चित्र दिसते.
एखाद्या व्यसनाच्या आहारी मनुष्य गेला की त्याची काय अवस्था होते ,तो कशा प्रकारे त्याच्यासमोर लाचार बनतो हे सध्या तंबाखु शोधविरांकडे बघितल्यावर समजते. सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. याच व्यसनापायी आज अनेकांच्या संसारांची राखरांगोळी झाली आहे.आणि अजुन होत आहे, सध्याच्या काळात पैसे जपून वापरले पाहिजेत. येणारा काळ संकट अधिक गडद करणारा आहे त्यामुळे अनाठायी खर्चांना लगाम लावला पाहिजे. असा अजिबात विचार या तंबाखु बहाद्दरांकडून केला जात नाही, अगदी शंभर रुपया पर्यंत जरी भाव पोहचला तरी तंबाखु खरेदी थांबायची नाही, असेच चित्र सध्या दिसते आहे. मद्यविक्री , तबांखुजन्य पदार्थ विक्रीतून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली तरी ,व्यसनाधिनतेमुळे भविष्यात समाज आणि पर्यायाने देशाची अधोगतीच होऊ शकते. याचा सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे आणि व्यसनांचा हा राक्षसाचा वध या कोरोना काळात करण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया.
Leave a comment