जिल्ह्यातील 52 जण कोरोनामुक्त ; घाटीत कोविडबाधित महिलेची प्रसूती
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 22 कोविडबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर ते आज कोविडमुक्त झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 52 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
आज नव्याने 30 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 508 झाली. आज वाढलेल्या शहरातील कोरोनाबाधितांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (6), कटकट गेट (2), बाबर कॉलनी (4), आसेफीया कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), रामनगर-मुकुंदवाडी (1), भवानीनगर, जुना मोंढा (2) सातारा परिसर (1) पानचक्की (1) आणि जुना बाजार (1), पुंडलिक नगर (9) आणि गंगापूर (1) या परिसरातील रुग्ण आहेत. यामध्ये 15 पुरूष आणि 15 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित 508 रुग्णांमध्ये 311 पुरूष, 197 महिला आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये (कंसात कोरोनामुक्त झालेले रुग्ण) बागवान मस्जिद(5), नूर कॉलनी (6), किलेअर्क (3), भीमनगर(1), चेलीपुरा (1), छोटी मंडी, दौलताबाद (1), समता नगर (2), बडा टाकिया मस्जिद (1), सातारा परिसर (1), जलाल कॉलनी (1) या परिसरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे रूग्णालयाने कळवले आहे.
कोविडबाधित महिलेची घाटीत प्रसूती, बाळ- बाळांतीन सुखरूप
करिम कॉलनी, रोशन गेट येथील 30 वर्षीय कोविडबाधित महिलेची आठ मे रोजी प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न झाले. दोघीही सुखरूप आहेत. त्यांची तब्येतही ठीक असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी सांगितले.
स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा म्हणाले, सदरील महिला तिच्या चौथ्या प्रसुतीसाठी विभागात दाखल झाल्या. त्या कंटेन्मेंट झोनमधील असल्याने त्यांना स्वतंत्र कक्षात भरती केले गेले. त्यांच्या लाळेचे नमुने घेतले. तो अहवाल काल 8 मे रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महिलेला पुढील उपचारासाठी डीसीएचमध्ये हलविले आहे. औषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य, नवजात शिशु शास्त्र विभागप्रमुख डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह त्यांची टीम बाळ-बाळांतीन यांची काळजी घेताहेत. बाळाचे वजन 3.7 किलोग्रॅम आहे,असेही डॉ.गडप्पा म्हणाले.
घाटीत 42 कोविड रुग्णांवर उपचार
घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) 42 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 39 रुग्णांची स्थिती सामान्य, तर तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. 38 कोविड निगेटीव्ह रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. 23 कोविड निगेटीव्ह बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. शहरातील सिल्क मिल कॉलनीतील 60 वर्षीय महिला, मकसुद कॉलनी , सिकंदर पार्क येथील 37 वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील राम नगरच्या 80 वर्षीय पुरुष, किलेअर्कमधील 35 वर्षीय महिला, जुना बाजारातील 75 वर्षीय पुरूष आणि आणि गंगापुरातील फुलशेवडा जि.प शाळा येथील 76 वर्षीय पुरूष या रुग्णांचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच पुंडलिक नगर येथील 58 वर्षीय महिला रुग्णास घाटीतून मिनी घाटीत काल (8 मे रोजी) संदर्भीत करण्यात आले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत 43 रुग्णांचे स्क्रीनिंग झाले. 18 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 97 रुग्ण भरती असल्याचे डॉ.येळीकर, माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.
कंपनीकडून रोबोट भेट
वाळूजच्या रुचा इंजिनियरर्स प्रा.लि कंपनीकडून घाटीतील कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असा रोबोट भेट देण्यात आला. औषध पुरविणे, कक्षामधील सॅनिटायझेशन करणे, रुग्णांच्या खाटापर्यंत सेवा देण्याचे काम या रोबोटकडून होऊ शकते, असे मत डॉ.येळीकर यांनी व्यक्त करत या कंपनीचे आभार मानले.
Leave a comment