औरंगाबादेतील चार महत्वाच्या खासगी रुग्णालयात होणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेंर्गत उपचार
मराठवाड्यातील रुग्णांना मिळणार मोफत उपचाराचा लाभ
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद येथील शेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, एमजीएम आणि डॉ. हेडगेवार ही चार महत्वाची रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. योजनेच्या यावर्षीच्या नविन करारा संदर्भात या रुग्णालयांच्या काही हरकती व शंकांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निरसन करून रुग्णालयांना योजनेंतर्गत समावेश असलेले उपचार देण्याविषयी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत आज झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. त्यामुळे आता मराठवाड्यातील सामान्य जनतेला मोफत उपचार मिळू शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. औरंगाबादला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दली. तेथील व्यवस्थापन अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रमुखांसमवेत बैठक घेतली.
शहरातील धूत, बजाज, एमजीएम, डॉ. हेडगेवार ही मोठी रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी होते. मात्र यावर्षीच्या नविन कराराबाबत या रुग्णालयांच्या काही हरकती, शंका होत्या त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी या हरकती आणि शंकांचे निरसन केले आणि रुग्णालयांना आश्वासीत करतानाच सुधारीत करारानुसार नागरिकांना उपचार देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत यावेळी करारावर रुग्णालय व्यवस्थापनाने स्वाक्षर्या केल्या. त्यानुसार आता या चार रुग्णालयांच्या माध्यमातून सामान्यांना उपचार मिळू शकतील. या बैठकीस खासदार भागवत कराड, एमजीएम हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुर्यवंशी, डॉ.हेडगेवार हॉस्पीटले डॉ.तुपकरी, डॉ.पांढरे, धुत हॉस्पीटलचे डॉ.गुप्ता, बजाज हॉस्पीटलचे डॉ.श्रीवास्तव, डॉ.पठाण आदी यावेळी उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यातील 1000 रुग्णालयांचा समावेश असून त्यामध्ये कोरोना आणि कोरोना शिवाय अन्य आजारांसह महाराष्ट्रातील 100 टक्के जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी बाळंतपण आणि सिझेरियन खासगी रुग्णालयात होत नव्हते. आता या योजनेंतर्गत त्याचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणार्या अवाजवी दराला चाप लावण्यासाठीही महत्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सागितले.
Leave a comment