डॉक्टर आपल्या दारी अभियानातून 60 हजार जणांची आरोग्य तपासणी
कोरोनाची लक्षणं असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही-डॉ. सरदेसाई
सिल्लोड । वार्ताहर
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार कोरोना विषाणूच्या अनुषंगाने खबरदारी चा उपाय म्हणून सिल्लोड शहरात राबविण्यात आलेल्या डॉक्टर आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून शहरातील 60 हजार नागरिकांची थर्मल स्क्रीन करण्यात आली असून किरकोळ आजार वगळता सर्दी,ताप, खोकला या सारख्या कोरोनाचे लक्षण असलेले एकही रुग्ण शहरात आढळून आले नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ.हर्षल सरदेसाई यांनी दिली.असे असले तरी कोरोना पासून प्रत्येकाने खबरदारी घेवून सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे असे अवाहन डॉ. सरदेसाई यांनी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांची थर्मल तपासणी करण्यात सिल्लोड नगर परिषद पहिली नगर परिषद ठरली आहे.
राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 मे रोजी डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली होती . आज शनिवार ( दि.10 ) रोजी या अभियानातून संपूर्ण शहरातील नागरिकांच्या थर्मल स्क्रीनींगचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. या अभियानातून शहरातील 11410 कुटुंब तसेच 60 हजार 430 नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली आहे. अभियानात साधा ताप, पोट दुखी, पाठ दुखी यासारखे काही रुग्ण दिसून आले. त्यातील काहींना औषोधोपचार दिला तर काहींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र कोरोना सदृश्य आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही . त्यामुळे आज घडीला सिल्लोड शहर कोरोना पासून पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी शहराला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचे नियम व सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे असे अवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे. ना.अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियान राबविण्यात आले. हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाले असून शहरातील नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली आहे .या अभियानाला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला तसेच न.प. कर्मचारी, उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका, धन्वंतरी डॉक्टर व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व डॉक्टर ,आशा सेविका, नॅशनल व प्रगती शिक्षण संस्थेचे शिक्षक वृंद, पोलीस बांधव न.प.चे सन्माननीय नगरसेवक व शहरवासियांची या अभियानात मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले अशा शब्दात न.प.चे मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
नागरिकांच्या आदरातिथ्याने डॉक्टर भारावले
डॉक्टर आपल्या दारी अभियानानिमित्त शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टर, नगरपरिषद कर्मचारी, अशा सेविका उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सेस व अभियानातील इतर सदस्यांचा कामाचा गौरव म्हणून तसेच त्यांचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला तसेच काही ठिकाणी थाळी नाद करण्यात आला बर्याच ठिकाणी औक्षण करून डॉक्टर व अभियानातील सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नागरिकांचा हा आदरातिथ्य पाहून अभियानातील सर्वजण भारावून गेले.
अध्याप लढाई संपलेली नाही .. सुरक्षित रहा .. खबरदारी घ्या-ना.अब्दुल सत्तार
सिल्लोड शहरांमध्ये नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आलेले आहेत .सुदैवाने किरकोळ आजार वगळता या अभियानात कोरोना सदृश्य लक्षण असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी कोरोना विरुद्ध ची आपली लढाई अद्याप संपलेली नाही असे स्पष्ट करीत नागरिकांनी लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, बाहेर गावातून आलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस स्टेशन किंवा नगरपरिषदेला द्यावी, सरकारच्या पुढील आदेश येईपर्यंत घरातच सुरक्षित रहावे, खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहे. डॉक्टर आपल्या दारी अभियानात शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. काही कारणाने आरोग्य तपासणी पासून काहीजण राहिले असल्यास अशा नागरिकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात जावून आपली तपासणी करून घ्यावी असे अवाहन नगराध्यक्षा राजश्री निकम यांनी केले आहेत.
Leave a comment