सिल्लोड । वार्ताहर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्या नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील जवळपास 30 हजार गरजू कुटुंबांना टप्या-टप्याने शिवसेना युवा सेनेच्या वतीने अन्नधान्य तसेच किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे. गुरुवार (दि.7) रोजी तालुक्यातील शिवना गावामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करून ही मदत वाटण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल , पंचायत समिती सदस्य शेख सलीम, अजिंठा सरपंच दुर्गाबाई पवार, हाजी शेख सलीम ,माजी जि. प.सदस्य मुरलीधरराव काळे, राजू बाबा काळे, पंजाब चव्हाण,माजी सरपंच इस्माईल कुरेशी, सुधाकर काळे, रामेश्वर काळे ,गणेश सपकाळ, पप्पू राऊत आदींची उपस्थिती होती.
लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून सिल्लोड मध्ये शिवसेना युवासेना तसेच राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने अन्नधान्य, किराणा किट, दूध तसेच गरजू कुटुंबांना दररोज सकाळ-संध्याकाळ घरपोच जेवण देण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे वाढलेले लॉकडाऊन यामुळे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसापूर्वी सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील हातावर पोट भरणारे कुटुंब, विधवा, शेतकरी आत्महत्या कुटुंब अशा प्रकारच्या जवळपास 30 हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक असलेले किराणा कीट देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने गुरुवार रोजी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
मतदार संघातील जि. प. सर्कल निहाय गावांना टप्प्या टप्प्याने ही मदत वाटण्यात येत आहे. प्रारंभी मतदारसंघातील व सर्कलमधील मोठ्या गावांमध्ये ही मदत वाटण्यात येत आहे. त्यानंतर सर्व लहान मोठ्या गावात की मदत पोहचविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मतदारसंघातील हातावर पोट भरणारे तसेच गरजू नागरिकांना ही मदत वाटण्यात येत असल्याने मतदारसंघातील शिवसैनिकांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहेत. गरजू कुटुंबाना मदत वाटप करत असताना नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, तसेच आपण जर घरात सुरक्षित राहिलो तर नक्कीच सिल्लोड मतदारसंघाला कोरोना पासून सुरक्षित ठेवू असे स्पष्ट करीत आपण सुरक्षित असलो तर राज्य सुरक्षित राहील, आणि राज्य सुरक्षित असले तर देश सुरक्षित राहील यासाठी कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने घरातच रहावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
Leave a comment