पैठण तहसीलदारांच्या आदेशाने अप-डाऊन करणारे चिंतेत
विहामाडंवा । वार्ताहर
औरंगाबाद शहर रेड झोन घोषित झाल्यामुळे औरंगाबाद शहरातून तालुका स्तरावर अप डाऊन करणार्या सर्वच शासकीय कर्मचार्यांना तालुक्याच्या मुख्यालयी राहण्याचे लेखी आदेश तहसीलदार पैठण यांनी आज दिले असून संबंधित कार्यालय प्रमुखाने सर्व कर्मचारी मुख्यालयी राहतात याची खातरजमा करून तहसीलदार यांना अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे. मुख्यालयी न राहणार्या कर्मचार्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे.
पैठण तालुक्याला लागून असलेले औरंगाबाद शहर हे रेड झोन मध्ये दाखल झाले आहे. पैठण शहरातील 60% शासकीय कर्मचारी औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याचे समोर आले आहे. अशा आपत्तीसदृष्य परिस्थितीत विविध उपाययोजना करण्यात येत असून औरंगाबाद शहरात कोविड - 19 विषाणूचा प्रसार जलद गतीने होत असल्यामुळे पैठण तालुक्यात सदर विषाणूचा प्रसार व संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैठण तालुक्यातील परिस्थितीबाबत तालुका स्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय , खाजगी कार्यालयांमधील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी , ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामविस्तार, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, पोलीस पाटील, कोतवाल तसेच एमआयडीसी पैठण मधील विविध कंपनीतील कामगार, मेडीकल असोशिएशन वकर्स, यांनी त्यांच्या मुख्यालयी उपस्थित रहावे असे लेखी पत्र आज विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना तहसीलदार यांनी बजावले आहे. पैठण तालुक्यातील अधिनस्त सर्व कार्यालयांना हे आदेश लागू असल्याने सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयीन व क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी कर्मचारी हे मुख्यालयी हजर राहत असल्याची खातरजमा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर करावा असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी गैरहजर असल्यास संबंधित अधिकारी कर्मचार्याचा कार्यालयीन प्रमुखांनी अनुपस्थित असल्याचा अहवाल नियुक्ती प्राधिकरणास देऊन संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 य साथरोग प्रतिबंधक कायदा - 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.
60% कर्मचार्यांचे अपडाऊन;अंमलबजावणी कडे लक्ष
पैठण शहरात विविध राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, खाजगी वित्त पुरवठा करणार्या संस्थेचे कर्मचारी अधिकार्याचे औरंगाबाद शहरातून अपडाऊन सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व बहुतेक कार्यालयाचे प्रमुखच औरंगाबाद शहरातून अपडाऊन करत असल्याने तहसीलदारांच्या आदेशाच्या अंमलबजावणी कडे पैठण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment