मुंबई | वार्ताहर
कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणुची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
कामगाराला विषाणू लागन झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फाॅरवर्ड केली जात आहे. अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीनसुद्धा नाही, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
फाॅरवर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरविण्यात येत आहे. कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणुची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई येईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे पसरविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणताही कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात पत्रकात करण्यात आले आहे.
Leave a comment