औरंगाबाद । वार्ताहर
कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांचा तेराव्या दिवशीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने कोरोनामुक्त झालेल्या सात जणांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी पाठविले आहे, अशी माहिती घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
रुग्णांना घरी पाठविताना महापौर नंदकुमार घोडेले, मिनी घाटीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यात आजपर्यंत 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. काल पाचजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी म्हणजे आज पुन्हा सात जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यंत 32 पैकी एकूण 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या मिनी घाटीत 12 तर घाटीमध्ये 2 अशा एकूण 14 कोरोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. आज 96 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 56 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घाटीतील प्रयोगशाळेत 46 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. तर काल आणि आजचे मिळून 44 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रयोगशाळेतून एकूण 48 स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत दोघांवर उपचार सुरू
घाटीत 60 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी रविवारी (दि.19) पॉझिटिव्ह आली. या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाला घाटी रुग्णालयात 19 रोजी सकाळी भरती करण्यात आले. तत्काळ त्यांचा कोविड 19 चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांच्यावर घाटीतील डॉक्टरांकडून योग्य ते उपचार सुरू आहेत. आज 20 रोजी दुपारी 04 वाजेपर्यंत 24 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 09 जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते, ते निगेटीव्ह आले आहेत. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात (ऊउक) एकूण 27 जण भरती आहेत. भरतीतील रुग्णांपैकी मिनी घाटीतून एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास घाटीमध्ये संदर्भीत करण्यात आलेले आहे. तीन रुग्णांना उपचारांती घरी पाठविलेले आहे. तर मागील चोविस तासात रूग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांचीही कोविड चाचणी निगेटीव्ह आलेली आहे, असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.
Leave a comment