“नेमकं चाललंय तरी काय?” असा कार्यकर्त्यांचा सवाल
नवी दिल्ली | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयात घडलेल्या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. तटकरे-पटेल गटाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या एका नेत्याला कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर केवळ दिल्लीच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नेते दिल्लीतील पक्ष कार्यालयात नियोजित बैठकीसाठी पोहोचले होते. मात्र, प्रवेशद्वारावरच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले. “वरून आदेश आहेत,” असे सांगत प्रवेश रोखल्याचे बोलले जात आहे. काही वेळ कार्यालयाबाहेरच चर्चा आणि शाब्दिक वाद झाल्याची माहितीही समोर येत आहे.
या घटनेनंतर पक्षामध्ये दोन वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. एका गटाकडून हा “प्रोटोकॉल”चा भाग असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे संबंधित नेत्यांच्या समर्थकांनी मात्र हा सरळसरळ अपमान असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयीन व्यवस्थेवरूनच पक्षातील अंतर्गत नाराजी बाहेर पडल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गटातील काही नेत्यांमध्ये संघटनात्मक निर्णय, पदवाटप आणि दिल्लीतील समन्वय यावरून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच आता कार्यालयातील हा प्रकार घडल्याने त्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की, दिल्लीतील कार्यालयात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही याबाबत काही दिवसांपासून अंतर्गत पातळीवर तणाव सुरू होता. काही नेत्यांच्या भेटी, बैठका आणि पक्षश्रेष्ठींपर्यंत थेट पोहोच यावरून नाराजी वाढल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पक्षाकडून अधिकृत निवेदन आलेले नसले तरी सोशल मीडियावर मात्र कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “स्वतःच्या पक्षाच्या कार्यालयातच नेत्याला अडवले जात असेल, तर पक्षात नेमके सुरू तरी काय?” असा सवाल अनेक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील कार्यालयातील हा प्रकार केवळ सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा आहे की त्यामागे मोठा राजकीय संदेश दडलेला आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment