; ' बिबटयाच्या हल्ल्यात सहा जण जखमी -थेरगाव शिवारातील घटना..
पाचोड - विजय चिडे;-
दोन वर्षापासून पैठण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास ग्रामस्थ, पोलीस व वन विभागाच्या तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर थेरगाव (ता. पैठण) शिवारात रविवारी (ता. बारा) दुपारी जेरबंद करण्यात आले. बिबटयास पकडताना त्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून यांत एक पोलिस अधिकारी, एक पत्रकार, दोन शेतकरी व दोन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यासंबंधी अधिक माहीती अशी, रविवारी (ता. १२) सकाळी साडेसहा वाजता थेरगाव - वडजी रस्त्यालगत परमेश्वर पाचे युवक शेतात मकाच्या पिकास पाणी देत असताना त्यास कुत्रे भुंकत असल्याने त्याने आजुबाजूला पाहीले असता समोरून बिबटया येत असल्याचे दिसले. त्याने त्याच्या शेजारील शिवाजी निर्मळ, विश्वर निर्मळ यांस सांगितले. तोच शेत नांगरत असलेल्या शिवाजी निर्मळने त्या बिबटया मागे ट्रॅक्टर पळवला. ट्रॅक्टर पाठलाग करत असल्याने बिबटया गावालगत असलेल्या नवनाथ पाचे यांच्या बाजरी व मकाच्या पिकांत घुसला. यासंबंधी सय्यद सलीम, शेख पेरू व जावेद सैय्यद यांनी ग्रामस्थांना या घटनेची कल्पना दिली. माहीती मिळताच सर्वप्रथम पत्रकार हबीबखान पठाण, गावांतील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांचेसह ग्रामस्थांनी मका व बाजरीच्या पिकांस वेढा घालुन बिबट्यास 'त्या' पिकांत घेरून वनविभागासह पाचोड पोलिसांना घटनेची माहीती दिली. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उप निरीक्षक गोरक्ष खरड, युवराज शिंदे, सुधीर ओव्हळ, विलास काकडे, भगवान धांडे, नुसरत शेख, गोरख कणसे , जगन्नाथ उबाळे आदीं घटनास्थळी साडेसात वाजता पोहचले. त्यांनी बिबट्या असलेल्या पिकांची पाहणी करून जागोजागी तरुणास मार्गदर्शन करून त्यास पकडण्याची व्यूहरचना आखली. बिबट्याच्या हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी पाचोडहून विशेष ड्रोन कॅमेरा बोलविण्यात आला. ग्रामस्थ, पोलीस व सामाजिक कार्यकर्ते सकाळपासून विना आंघोळ, उपाशीपोटी बिबटयाला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी तिष्ठत उभे होते. अन् वन विभागाचे अधिकारी -कर्मचारी साडेपाच तासांनंतर निवांतपणे घटनास्थळी पोहचले. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड रोष व्यक्त केला. बिबट्याच्या अटकाव साठी दोन पिंजरे बसविण्यात आले. तर चार नॉयलॉनच्या जाळ्या कर्मचाऱ्यासह ग्रामस्थांकडे देण्यात आल्या. बेशुद्ध करण्याच्या औषधीचे इंजेक्शन बिबटयास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यास चाहूल लागताच त्याने माणसांच्या दिशेने झेप घेतली. यांत वनरक्षक पंढरीनाथ अहीरे, श्रीकांत वाव्हूळे जखमी झाले. त्यानंतर जाळीने थोपवून धरणाऱ्या पत्रकार शिवाजी पाचोडे यांचे वर त्याने हल्ला चढविला. यांत श्री पाचोडे यांस पाच दात लागले, तर पोलीस उपनिरीक्षक गोरख खरड, शेतकरी परमेश्वर निर्मळ, विकास निर्मळ यांचे वर पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले. एवढया परिस्थीतीत पत्रकार पाचोडे यांनी बिबटयाची मान घट्ट आवळली तर पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे, गोरक्ष खरड,विलास काकडे, गोरख कणसे, ग्रामस्थांनी त्यावर जाळे व चादर टाकून त्यास जेरबंद केले, बिबटयाचा थरार पाहून वन कर्मचारी मात्र थबकून बाजूला हटले. परंतु पोलीस व ग्रामस्थांच्या यशस्वीतेनंतर कर्मचाऱ्यांनी त्यास बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन त्यास पिंजऱ्यात जेरबंद केले. अखेर सहा तासानंतर बिबट्याचा थरार पिजऱ्यात कैद झाला.
त्यानंतर वनाधिकारी त्यास घेऊन औरगाबादला गेले. त्यास गौताळा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक अधिकारी एस बी तांबे यांनी सांगितले.
चौकट :
वन विभागाने बिबट्यास जेरबंद करावे म्हणुन ग्रामस्थांस तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत साधावा लागला संपर्क..... !
सात वाजता वन विभागाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांचे पथक येत नसल्याने मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवनसंरक्षक एस.पी. वडसकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी एवढेच न०हे तर वने व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसनमंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्याचे कार्य सचिव विकास खारगे यांचेशी संपर्क साधुन घटनेची कल्पना व वन विभागाचे अकार्यक्षमपणा समोर मांडावा लागला. तेव्हा साडेपाच तासानंतर वन विभाग खडबडून जागे झाले, अन् अखेर ग्रामस्थांच्या मदतीनेच त्यांना बिबटया जेरबंद करण्यात यश मिळाले.
Leave a comment