औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रशासन दक्ष आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची पल्सऑक्सीमिटर व थर्मामिटरव्दारे स्वत:च तपासणी करूण स्वत:चे संरक्षण करावे. जेणेकरून सर्वांचे संरक्षण होण्यास मदत होईल. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना या विषाणूला सर्वांनी मिळुन हद्दपार करूया! असे आवाहनही विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची कोरोना संदर्भात सोईसुविधांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. सर्वश्री अंबादास दानवे, अतुल सावे, संजय शिरसाठ, सतिश चव्हाण, आ. प्रदीप जैस्वाल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण, आदींची उपस्थिती होती. यावेळी खा. डॉ. भागवत कराड म्हणाले की, शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वॅब तपासणी केंद्राची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तर खा. इम्तियाज जलील म्हणाले की, कोरोनाबाधित रूग्णांकडून खाजगी रूग्णालयात अवाजवी शुल्क आकारण्यात येत आहेत. यावर निर्बंध आणने गरजेचे आहे. आ. सतीश चव्हाण कोरानाच्या सर्वेक्षणाकरिता केवळ शिक्षक वर्गाची नेमणूक करण्यात आली असून इतर कामाकरीता शासनाच्या सर्व विभागातून कर्मचार्यांची उपलब्धता करून देण्यात यावी. आ. अंबादास दानवे यांनी प्रशासनाच्या कामाबाबत अधिक जागरूतेने काम करण्याची गरज असल्याचे दिनर्शनास आणून दिले. तसेच कोरोना संदर्भातील दैनंदिन माहिती मनपा आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून मिळणे आवश्यक आहे. परंतु ती मिळत नसल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
नागरिकांनी कोविड-19 विषाणूची भिती न बाळगता, शारिरिक अंतर पाळणे, मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करणे अनावश्यक बाबींसाठी घराबाहेर न पडणे, मास्क वापरणे, तसेच वेळेवर औषोधोपचार करून घेणे गरजेचे असून, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यात जाणे महत्वाचे असून या विषाणुच्या प्रतिबंधाकरिता वेळेवर औषधोपचार करणे गरजेचे आहे असे सांगून श्री. केंद्रेकर म्हणाले की, मराठवाड्यातील परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सुविधांबाबत सजग आहे. घाटीमध्ये नुकतेच 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून मनुष्यबळाची आवश्यकता देखील पुर्ण करण्यात आली आहे. शहरात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के इतके आहे. तर गंभिर धोका आणि कमी धोका असणार्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासणी करणे, अलगीकरण कक्षातील नागरिकांच्या तक्रारी कमी करणे, स्वॅब तपासणीची संख्या वाढवीणे, कोविड बाधित रूग्णांची माहिती रोज विभागीय आयुक्त कार्यालयाला देणे, कोविड सेंटर म्हणुन नेमुण दिलेल्या दवाखान्यात तक्रार निवारण केंद्र उभारून तेथे महसूल अधिकारी नेमण्यात यावा आदी निर्देशही संबंधीतांना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी देऊन खाजगी कोविड रूग्णालयात दोन महसूल अधिकार्यांची नेमणूक करण्यात येणार असून रोज किती खाटा उपलब्ध आहे याची माहिती रूग्णालयांनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. घाटी रूग्णालयात कोरोनाबाधीत रूग्णांची माहिती नातेवाईकांना देण्याकरीता एक खिडकी उपलब्ध करून देण्यात आली असून दोन पाळ्यांमध्ये येथे कर्मचारी उपलब्ध असणार आहे. घाटी रूग्णालयातून आतापर्यंत 310 गंभीर कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले असून एकुण 665 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज रोजी 192 रूग्णांवर घाटीत उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. येळीकर यांनी यावेळी दिली.
Leave a comment