औरंगाबाद । वार्ताहर
देशासमोर एखादे मोठे आरोग्याचे संकट उभे राहिले तर आपल्याकडची आरोग्य व वैद्यकीय सेवांची परिस्थिती किती गंभीर आहे, हे कोरोनाच्या संकटाने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी पुढील काही वर्षे जातीपातीचे राजकारण न करता केवळ आरोग्य आणि वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यास प्राधान्य द्यावे. स्मारक, राजकीय नेत्यांचे पुतळे यांच्यावर होणारी कोट्यावधींची उधळपट्टी थांबवून आरोग्य सेवेसाठीच्या मुलभूत पायभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असा सल्ला औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पुर्ण झाले, पण कोरोनाच्या सावटामुळे सरकारला वर्षपुर्ती साजरी करता आली नाही. सरकारची वर्षभरातील एकूणच कामगिरी आणि लॉकडाऊन पाचची घोषणा यावर इम्तियाज जलील यांनी आपली परखड मते मिडियासमोर मांडली. इम्तियाज जलील म्हणाले, लॉकडाऊन पाचची घोषणा म्हणजेच सरकार कोरोनासमोर हतबल झाले हे सिध्द होते. आरोग्याशी संबंधित एखादे मोठे संकट जर आपल्यावर ओढावले तर त्यांच्याशी मुकाबला करतांना आपली कशी दमछाक होते, आपण आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरवण्यात, मुलभूत सोयी निर्माण करण्यात किती मागे आहोत हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले.
Leave a comment