औरंगाबाद । वार्ताहर
कॅनॉट प्लेस, सिडको येथील ओप्पो कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटर व मोबाईल शॉपी फोडून 1 लाख 50 हजार रुपयांचे मोबाइल चोरट्यानी 21 मे रोजी रात्री चोरून नेले होते. त्याचा तपास करून सिडको पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.
अनिल शिंदे (वय 22) व सोमिनाथ जाधव (वय 23) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मीर अस्लम बेग यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला असता पोलिसांना माहिती मिळाली की, दोन व्यक्ती महागडे मोबाईल विक्रीसाठी अमखास मैदानाजवळ थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली असता अगोदर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यांना अधिक सक्तीने विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 65 हजार रुपयांचे मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. गुन्ह्यातील इतर मोबाईल त्यांच्या साथीदाराकडे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस इतर साथीदारांचा तपास करत आहे
Leave a comment