सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीची पणन महासंघाकडे मागणी
सिल्लोड । वार्ताहर
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासकीय हमीभाव प्रमाणे कापूस खरेदी सुरू आहे. तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांची संख्या, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कापूस तसेच थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने सिल्लोड येथील शासकीय कापूस खरेदीसाठी ग्रेडरसह अतिरिक्त दोन टीम वाढवून द्यावे अशी मागणी सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे व उपसभापती नंदकिशोर सहारे यांनी पणन महासंघ नागपूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटल्याप्रमाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड कार्यक्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा कापूस शासकीय हमीभावात खरेदीसाठी सध्या एक ग्रेडर च्या साह्याने आळीपाळीने पुनीत इंटरप्राईजेस ,राधा सर्वेश्वर जिनिंग व किंजल कॉटन या तीन ठिकाणी खरेदी केला जात आहे. सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन झाले असून सद्यस्थितीत बाजार समितीकडे तीन हजार शेतकर्यांची नाव नोंदणी झालेली आहे. सध्या सिल्लोड येथील केंद्रप्रमुख यांच्याकडून दैनंदिन 40 ते 50 कापसाच्या वाहनांची खरेदी केली जात आहे . कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कापसाचे मोजमाप केले जात आहे. परंतु थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. तालुक्यातील शेतकर्यांकडे बराच कापूस शिल्लक असून खासगी बाजार भाव कमी असल्याने त्यांना शासकीय हमी भावात कापूस विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 40 ते 50 वाहन मोजले जात असल्याने उर्वरित अंदाजे 1 लाख 20 हजार क्विंटल कापूस मे महिना अखेर मोजणी होणे शक्य दिसत नाही. शेतकर्यास पुढील खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे .म्हणून शेतकर्यांचा होत असलेला उद्रेक थांबविण्याच्या दृष्टीने सदरचा उर्वरित कापूस मे अखेर मोजणी होणे आवश्यक आहे . म्हणून बाजार समितीकडे नोंदणी झालेला कापूस मे अखेर मोजणी होण्याच्या अनुषंगाने दोन ग्रेटरसह दोन टीम वाढून इतर दोन जिनिंग फॅक्टरीवर कापूस खरेदी सुरू करण्यात यावी किंवा तसे शक्य नसल्यास सद्यस्थितीत चालू असलेल्या कापूस खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त 120 वाहने मोजमाप होणेबाबत संबंधितांना आदेशित करावे अशी विनंती पणन महासंघाकडे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे.
Leave a comment