टाळ्या, औक्षण, पुष्प वृष्टीने अभियानाचे स्वागत
सिल्लोड ( प्रतिनिधी )
दि.6, कोरोना विषाणूच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार सिल्लोडमध्ये डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली आहे . शहरातील जवळपास एक लाख लोकांची या माध्यमातून घरोघरी जाऊन डॉक्टर आरोग्य तपासणी करीत आहेत. या अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून शहरातील विविध भागात नागरिकांनी टाळ्या वाजवीत तर काहींनी दारावर आलेल्या डॉक्टर व पथकातील सदस्यांचे औक्षण केले . तसेच काही ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत या अभियानातील डॉक्टर व सदस्यांचे स्वागत केले.
सिल्लोड नगर परिषद , उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड ,धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन ,जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे . त्यांना सहकार्य करण्यासाठी आशा सेविका ,नगरपरिषद कर्मचारी यांची साथ लाभत आहेत. बुधवार ( दि.6 ) रोजी अभियानाचा हा तिसरा दिवस होता. या तीनही दिवसात किरकोळ आजार वगळता कोरोना सदृश्य किंवा ताप, सर्दी, खोकला यासारखे रुग्ण आढळून आलेले नाहीत अशी माहिती धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश मिरकर यांनी दिली आहे. तर शहरांमध्ये या अभियानात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून स्वतः ची थर्मल स्क्रीनिंग करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याचे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील म्हणाले.
डॉक्टर आपल्या दारी या अभियानाची जनजागृती करून नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेण्यात शिवसेनेचे नगरसेवक ,पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहेत. सिल्लोड मध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह किंवा सदृश्य रुग्ण नाही. तरी देखील पुढील अनर्थ किंवा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिल्लोड येथे खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टर आपल्या दारी अभियानातून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये कोरोनाचे लक्षण असलेला एकही रुग्ण सिल्लोडमध्ये अद्याप आढळून आला नसल्याने सिल्लोड करांनी सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान डॉक्टर आपल्या दारी या अभियानात सरकारी यंत्रणेसोबत खाजगी डॉक्टरांचे मिळत असलेले सहकार्य, आरोग्य तपासणीसाठी नागरिकांचा उत्साह, विविध वार्डात अभियानाचे होत असलेले स्वागत पाहता ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतील डॉक्टर आपल्या दारी हे अभियान यशस्वीतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन युवा नेते अब्दुल समीर यांनी केले आहे.
Leave a comment