रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार.
औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात समाधानकारक आहे. याच पद्धतीने सर्व आरोग्य सुविधांमध्ये वाढ करत येत्या काळातील रुग्ण वाढीचा धोका लक्षात घेऊन वाढीव प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तीककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्री. काळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी निता पाडळकर यांच्यासह इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून आपण यशस्वीपणे कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. त्याच खबरदारीने आणि उत्साहाने येत्या काळात आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्नातून उपचार सुविधा वाढवणे, रुग्णांना तत्परतेने आवश्यक आरोग्य सेवा देणे यासाठी प्रयत्नशील रहायचे आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय पुर्वक उत्तम काम करावे. खाजगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयात वाढीव प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सीजनची मागणी वाढत जाईल. त्यादृष्टीने आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी यंत्रणांनी सतर्क रहावे. तसेच तातडीने जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यासाठी उद्योजकांसोबत बोलणी सुरु असून त्यांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करुन लवकरात लवकर जिल्ह्यात ऑक्सीजन उत्पादन आणि पुरवठा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
तसेच वाढीव प्रमाणात उपचार सुविधांसोबतच रुग्णांचे वेळेत निदान होणे हे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन सौम्य लक्षणे असतांनाच रुग्णाला बरे करण्यात यश येईल. त्यासोबतच रुग्ण गंभीर स्थितीत जाण्याचे आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण रोखता येईल. त्यादृष्टीने संशयितांचा शोध, तपासणी, चाचणी, उपचार या पद्धतीने अधिक मोठ्या प्रमाणात संशयित, बाधीत यांचे वेळेत निदान होण्यासाठी वाढीव प्रयत्न करावे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, मा. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राज्यभर राबविण्याच्या निर्णयातून रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठीचे एक मोठे पाऊल उचललेले आहे. ही महत्वपूर्ण मोहिम व्यापक लोकसहभागातून यशस्वी करावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्था, विविध मंडळे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी करत लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा. ही मोहिम व मोहिमेची उद्दीष्टे तळागळापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रचार साहित्य वाटप करावे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन ही मोहिम यशस्वी करावी. शासन स्तरावरुन कोरोना नियंत्रणासाठी सर्व आवश्यक सहकार्य उपलब्ध करुन दिल्या जाईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी पैठण हे तीर्थ क्षेत्र, पर्यटन स्थळ असून त्या पार्श्वभूमीवर याठिकाणी लोकांची होणारी वर्दळ लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालय सुरु करणे गरजेचे असल्याचे सांगितले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे रुग्णालय सुविधा अधिक बळकट केल्यास आसपासच्या रुग्णांना पर्यायी उपचार सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे औरंगाबाद रुग्णालयांवर येणारा भार कमी होऊन सिल्लोडसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना सहाय्य मिळेल. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथे बाहेर जिल्ह्यातून येणारे रुग्णांचे वाढीव प्रमाण लक्षात घेऊन त्यासाठीचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिल्यास जिल्ह्यातील उपचार सुविधा बळकट करण्यास मदत होईल, असे सांगितले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन खाटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे निर्देश सर्व रूग्णालयांना दिले असून या महिनाअखेर शासकीय आणि खासगी अशा सर्व रूग्णालयांत 1808 पर्यंत खाटांची वाढीव उपलब्धता होणार आहे, तसेच मनपा, जिल्हा परिषद, प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणांसह इतर सर्वजन योग्य पध्दतीने परिस्थिती नियंत्रीत ठेवण्यासाठी काम करत असून घाटी, जिल्हा रुग्णालय आणि मेल्ट्रॉन यांनी या आरोग्य आपत्तीत उत्कृष्ट उपचार सुविधा देत रुग्ण सेवेचा चांगला आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून श्री. केंद्रकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सीजनची वाढती मागणी लक्षात घेऊन मोठ्या खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी सुचित करण्यात आल्याचे सांगितले.
शहरातील तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणाच्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबतविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता तसेच पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी यावेळी माहिती दिली. घाटीच्या अधीष्ठाता डॉ. येळीकर यांनी गंभीर रुग्णांसाठी रेमेडिसीवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत असून घाटीमध्ये याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाटीत दाखल होणार्या रुग्णांमध्ये शहरातील 50 टक्के ग्रामीण भागातून 35 टक्के तर इतर जिल्ह्यामधून 14 टक्के याप्रमाणात रुग्ण दाखल होत आहे. घाटीच्या सुपरस्टेशालिटी इमारतीसाठी 265 पदांचा प्रस्ताव मंजूरीसाठी मंत्रालयात पाठविलेला असून तो मंजूर झाल्यास तातडीने मोठ्या प्रमाणात वाढीव रुग्णांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे डॉ. येळीकर यावेळी म्हणाल्या.
Leave a comment