परिसरातील नागरिक त्रस्त
पैठण । वार्ताहर
तालुक्यातील दावरवाडी परिसरातील महावितरण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेली एक ते दीड महिन्यापासून कोणत्याही कारणाशिवाय विजेचा लपंडाव चालू आहे. कधी कधी तर वीज दिवसभर गायब राहते, वार्याची/पावसाची साधी झुळूक जरी आली तर दावरवाडी,नांदर,ज्ञानेश्वर वाडी, कौंदर,डेरा, नानेगाव या गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. नशिबाने एखाद्यावेळेस वीज राहिली तर दिवसभरात 12 ते 13 वेळा वीजपुरवठा खंडित होतो. याबाबत महावितरण कर्मचार्यांना फोन करून विचारले असता तांत्रिक बिघाड आहे, दहा मिनिटात वीज येईल. तार पडली आहे, काम चालू आहे. वरिष्ठ कार्यालयातून वीज बंद केली, कधी येईल सांगता येत नाही. असे ठरवलेली उत्तर रोजच दिली जाते. अशा मनमानी पद्धतीच्या कारभारामुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विज निगडीत उद्योगधंदे व व्यापारी वर्ग हतबल आणि हैराण झाला आहे. एकीकडे कोरोणा सारख्या महामारी संकटाचा सामना करत असताना, परिसरातील नागरिकांना महावितरण अधिकारी-कर्मचार्यांच्या मुळे वीज संकटाचा सुद्धा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येथील नियुक्त ज्युनिअर इंजिनिअर श्री त्रिवेदी हे कधीच मुख्यालयी थांबत नाही, त्यांचा मोबाईल नंबर तर सतत बंद अवस्थेत असतो. एखाद्यावेळी फोन लागलाच,तर उचलत नाही. राज्यात कुठेही भारनियमन नसताना दावरवाडी परिसरात दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत दोन तासाचे भारनियमन करण्यात येते, असे असूनही दिवसभर या ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडित करतात. परिसरातील प्रत्येक गावाची वीज पुरवठा जोडणी वेगळी करण्यात यावी, ही मागणी बरेच दिवसापासून येथील नागरिक करीत असूनही याकडे अधिकारी श्री त्रिवेदी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे उदा.ज्ञानेश्वर वाडी भागांमध्ये विजेबाबत समस्या निर्माण झाली की वरील सर्व परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. वीज पुरवठा खंडित होणे नित्याचे झाले आहे, शिवाय तक्रार केल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई केली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणचा गलथान व व मनमानी कारभारामुळे तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. येत्या सात दिवसात सदर निवेदनावर दखल घेत योग्य ती कारवाई न केल्यास छावा क्रंतिविर सेना व ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रमुख मागण्या:-1) नांदर, डेरा, नानेगाव, ज्ञानेश्वर वाडी, दावरवाडी, कौंदर या परिसरातील वीज पुरवठा वेगळा करण्यात यावा 2) अधिकारी-कर्मचार्यांना शासन निर्णयाप्रमाणे मुख्यालय थांबण्याचे आदेश कार्यन्वित करण्यात यावे. 3)सकाळी 6 ते 8 वाजता असणारे दोन तासाचे भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे. यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे,जिल्हा सचिव भगवान सोरमारे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत भुमरे, रवी सातपुते, रामनिवास मोदानी, गोपाल धारे, संतोष सरोदे, कल्याण जगताप, बबन तांगडे, गणेश तांगडे, आदी शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
Leave a comment