औरंगाबाद । वार्ताहर
खरीप पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून विहीत मुदतीत शेतकर्यांनी आपल्या पिकांचा विमा काढावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पीक विमा बाबतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, एलडीएम करेगावकर, डीसीसी बँकेचे आर.डी.आहेर, बाळासाहेब जोशी, रामनाथ भिंगरे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी एकाच वेळी गर्दी करु नये. कटाक्षाने 31 जूलै पूर्वी पीक विमा काढण्याची खबरदारी घ्यावी तसेच गर्दी टाळून भौतिक अंतर ठेऊन पीक विमा काढावा. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. जास्तीत जास्त शेतकर्यांनी पीक विमा विहीत मुदतीत भरावा, यासाठी योग्य जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले. आजपर्यंत सीएससी.केंद्रामार्फत 353251 अर्जदारांनी 141842 हेक्टर तर बँके मार्फत 3029 अर्जदारांनी 1826 हेक्टर असा एकूण 356280 अर्जदारांनी 143667 हेक्टर वर पीक विमा काढलेला आहे. यामध्ये अधिक शेतकरी सहभागी होण्यासाठी बँकांनी पीक विमा स्वीकारण्याची गती वाढवावी . ज्या कर्जदार शेतकर्यांना पीक विमा काढायचा नाही त्यांच्याकडून लेखी घेऊन उर्वरित कर्जदार शेतकर्यांचा पीक विमा भरून घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही योजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सन 2020_21, 2021_22 व 2022_23 या तीन वर्षासाठी खरीप व रब्बी पिकांचे विमा प्रस्ताव स्वीकारणे साठी एचडीएफसी एर्गो या विमा कंपनीची शासनाने निवड केलेली आहे. खरीप हंगामामध्ये खरीप ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, खरीप कांदा या पिकांचा अधिसूचित महसूल मंडळामध्ये पीक विमा स्वीकारला जाणार असल्याचे मोटे यांनी सांगितले. यावेळी पीक विमा कंपनीने प्रचार प्रसिध्दीसाठी तयार केलेल्या दोन रथाना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते झेंडा दाखवण्यात आला.
Leave a comment