सिल्लोड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच सोयगावच्या भौगोलिक व अधिक उपलब्ध वैद्यकीय सुविधेचे अंतर पाहता भविष्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव येथे सरकारच्या वतीने मुंबईच्या धर्तीवर 100 खाटांचे सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा उभारण्यात यावे अशी मागणी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनतर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या कामास संमती दिली असून लवकरच सोयगाव येथे सर्वसोयीयुक्त वैद्यकीय सुविधा उभारण्यास गती येणार आहे. राज्यातील कोरोना बाबत सद्यस्थितीचा आढावा व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच येत्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. हा सण साद्या पद्धतीने व नियमांचे पालन करून कसा साजरा करता येईल यासाठी विविध खात्याचे मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील उच्च अधिकार्यांचे मत जाणून घेण्यासाठी मंगळवार ( दि.14 ) रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक सपन्न झाली. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री म्हणून धुळे तसेच सिल्लोड - सोयगाव मतदारसंघ व औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांवर संवाद साधला यावेळी ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
मतदार संघातील सोयगाव तालुका दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. सोयगावला लागूनच कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जळगाव ,मालेगाव आहेत. सोयगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 30 वर्षे जुने असून मोडकळीस आलेले आहेत . येथील रुग्णांना अधिक उपचार घ्यायचा असेल तर यासाठी औरंगाबाद 120 किमी तर जळगाव हे 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सोयगाव व परिसरातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मुंबईला ज्या पद्धतीने सेडच्या माध्यमातून सर्व सुविधा युक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्याच पद्धतीने सोयगाव येथे 100 खाटांच्या सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देने गरजेचे असल्याचे ना. अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. या कामास मुख्यमंत्र्यांकडून संमती आल्याने सोयगाव व परिसरातील नागरिकांना आता सर्व सुविधायुक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या चार महिन्यांमध्ये साजरे केले जाणारे विविध सण, संतांच्या तसेच महापुरुषांची जयंती, पारंपरिक उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. त्याच पद्धतीने कोरोनाचा धोका लक्षात घेता कोठेही गर्दी न होता , येणार्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईद सण साध्या पद्धतीने साजरी करण्यासाठी धुळे व औरंगाबाद येथील मुस्लिम धर्मगुरू व प्रमुखांशी चर्चा करण्यात आली. रमजान ईद ची नमाज ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी घरीच पठण करून ईद साजरी केली. त्याचप्रमाणे बकरी ईद देखील गर्दी न करता कोरोना बाबत नियमांचे पालन करून व साध्या पद्धतीने साजरी करण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू तसेच प्रमुख यांचे सहकार्य मिळत असल्याचे ना. अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
Leave a comment