औरंगाबाद । वार्ताहर
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अँटीजेन टेस्टिंग वाढवावे, तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना बाधित रूग्णांच्या उपचाराकरीता खाटांची संख्या वाढवण्याचे निर्देश महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी रूग्णालयांतील कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. जिल्हाधिकारी उदय चौधरी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रूग्णांचे वेळेत निदान होणे आवश्यक असल्याने सर्वेक्षणावर अधिक भर देऊन केलेले सर्वेक्षण गुगल लोकेशनवर संकलित करावे जेणेकरून सर्वेक्षण अचूक होऊन विषाणूचा संक्रमणास आळा बसेल. तसेच ग्रामीण भागात अँटीजेन टेस्टिंग वाढवण्याची गरज असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, एका कोरोनाबाधित रूग्णाच्या मागे किमान 25 ते 30 हायरिस्क काँटॅक्ट असलेल्या लोकांचे काँटॅक्ट मॅपींग करून त्यांना तातडीने क्वारंटाईन करून त्यांची स्वॅब चाचणी करावी. तसेच कोविड डेडीकेट रूग्णालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्यावर भर द्यावा जेणे करून अधिकाधिक गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
औरंगाबाद शहरात संचारबंदी कडक असून कोरोना योद्धे चांगले काम करत असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाने कौतुक करत श्री. शिंदे म्हणाले की, एमआयडीसीमध्ये लिक्वीड ऑक्सीजन निर्मितीसाठी एका महिन्यात प्लांट उभारता येईल का जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद मध्ये 31 जुलै पर्यंत आयसीयु खाटांची व्यवस्था असल्याचे सांगितले. तसेच जुलै महिना अखेर पर्यंत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रूग्णालयात 100 तर शासकीय रूग्णालयात 50 खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरात आज घडीला साडेसहा हजार अँटीजेन टेस्ट झाल्या असून सर्वेक्षणामुळे रूग्णाचे निदान आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे श्री. चौधरी यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त श्री. पाण्डेय यांनी संचार बंदीच्या काळात महानगरपालिकेतर्फे 15 पथकाव्दारे कन्टेनमेंट झोन, आयसोलेशन वार्ड, शहरातील मुख्य दोन चेक नाक्यावर अँटीजेन टेस्टिंग करण्यात येत आहे. शहरात प्रवेश करणार्या नागरिकांच्या तपासणीसाठी चेक नाक्यांवर 24 तास पथक कार्यरत असून यामध्ये एक डॉक्टर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा ऑपरेटर यांचा समावेश आहे. तसेच नऊ पथकाव्दारे ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आला त्या परिसरात कॉनटॅक्ट मॉपिंगद्वारे 500 मीटर परिसरातील लोकांची ण्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये बाधित रुग्णांना सीसीसीमध्ये पाठवले जात असून ज्यांचा अहवाल निगेटीव्ह आला त्यांचा आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेण्यात येतो. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधितांना क्वारंटाइन ठेवल्या जात आहे. त्यासोबतच सहा चेक नाक्यावर तपासणी सुरू असून या व्यतिरीक्त येथे वाळूज भागातून येणार्या सर्व कामगारांचीही ए.एस.क्लब जवळ चाचणी करण्यात येत असल्याचे श्री. पांडेय यावेळी सांगितले.
Leave a comment