औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आणखी चार-पाच महिने कोरोनाचे संकट असेच राहिले, तर औरंगाबादेतील जवळपास एक हजार लघु उद्योग बंद पडतील, अशी भीती ’मासिआ’ या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे. औरंगाबादेतील लघु उद्योगांना 24 मार्चपासून मे च्या पहिल्या आठवड्यार्यंत लॉकडाऊनची झळ बसली आहे. आता आणखी नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
नवीन सुरू झालेले उद्योग व लघु उद्योगांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. जिल्ह्यात 5 हजार लघु उद्योग असून, त्यामध्ये जवळपास एक लाख कामगार काम करीत आहेत. मागील तीन महिन्यांच्या काळात सरासरी 10 ते 20 टक्के उत्पादन घेण्यात आले असून, या उद्योगातील जवळपास 15 हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. एकीकडे, उत्पन्न नाही. हातात पैसा नाही. दुसरीकडे, ‘फिक्सड ओव्हरहेड’ मानगुटीवर बसलेले आहे. त्यापासून सुटका नाही. बँकेचा कर्जाचा बोजा, व्याज, कामगारांचे पगार, उद्योग बंद असला तरी विजेचे फिक्सड चार्जेस्’ याची तरतूद करावीच लागते, ही चिंता लघु उद्योजकांना सतावत आहे. येथील लघु उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात औरंगाबादबाहेरच्या ऑर्डर आहेत. एप्रिलमध्ये देशविदेशात लॉकडाऊन होते. त्यामुळे त्या महिन्यात परिणाम जाणवला नाही. मे महिन्यात बाहेरच्या उद्योगांनी सांभाळून घेतले. आता 10 तारखेपासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये बाहेरच्या ऑर्डर अन्य शहरांकडे वळण्याची भीती, मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केली आहे.
Leave a comment