वडगाव कोल्हाटी आरोग्य उपक्रेंद्रास जिल्हाधिकार्यांची भेट
औरंगाबाद । वार्ताहर
सर्दी, ताप, खोकला, दम लागणे,श्वास घेण्यास त्रास होत असणार्या व्यक्तींचे नमुने तपासावेत. सर्वेक्षणात वाढ करावी, तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधण्यावर भर द्यावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या.
वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी आरोग्य उपकेंद्रास श्री. चौधरी यांनी भेट देऊन येथील उपकेंद्राच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक आयुक्त शिवाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, तहसीलदार किशोर देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते, डॉ. गणेश कल्याणकर आदींची उपस्थिती होती. वडगाव कोल्हाटी आरोग्य उपकेंद्रांतर्गत आतापर्यंत 996 कोरोनाबाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर आज 155 लाळेचे नमुने घेतल्याचे डॉ. गंडाळ यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. आढाव्यानंतर श्री. चौधरी यांनी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सविस्तर संवाद साधला. तसेच त्यांच्या कामाचे कौतुक केले.
Leave a comment