सिल्लोड । वार्ताहर
सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तसेच पुढील धोका लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव तालुक्यातील जरंडी व सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे ऑक्सिजन सुविधेसह प्रत्येकी 50 नवीन बेड ची वैधकीय सुविधा येत्या 4 दिवसात देण्यात येणार आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते.
सोयगाव तालुक्याला लागून असलेल्या जळगाव ,मालेगाव ,इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या प्रभावित क्षेत्रात नागरिकांचे येणे जाणे सुरू आहे. जरंडी येथे आज कोरोनाचे रुग्ण नाही तसेच शिवना गावा जवळील अजिंठा येथे कोरोनाचे रुग्ण असले तरी आज शिवना येथे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहेत. मात्र ग्रामीण भाग तसेच सीमावर्ती भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून सोयगाव तालुक्यातील जरंडी व सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने याबाबत ना. अब्दुल सत्तार यांनी जरंडी व शिवना येथे प्रभावी उपाययोजना करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जरंडी आणि शिवना येथे ऑक्सिजन सुविधेसह प्रत्येकी नवीन 50 बेडची वैधकीय सुविधा येत्या 4 दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
नियम पाळून सहकार्य करण्याचे ना.अब्दुल सत्तार यांचे आवाहन
जरंडी तसेच शिवना येथे खबरदारीचा उपाय म्हणून सुविधा निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी कोरोनाच्या व्यतिरिक्त इतर आजार संबंधी तपासणी व उपचार कायम ठेवण्यात यावे, इतर आजारांच्या रुग्णांना अडथळा निर्माण होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याचे ना.अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सिल्लोड व सोयगाव तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने योद्धा म्हणून काम केले पाहिजे. प्रशासन आपल्या सोबत आहेतच पण लोक जोपर्यंत नियम पाळणार नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करीत यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे ,वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, विनाकारण घराबाहेर न पडणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
Leave a comment