आर्थिक गुन्हे शाखेतील अधिका-यासह शिपाई संपर्कात
औरंगाबाद : पोलिस आयुक्त कार्यालयात पुन्हा कोरानाने शिरकाव केला. दोन महिन्यांपुर्वी आयुक्त कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला होता. यावेळी पोलिस नियंत्रण कक्षातील निरीक्षक आणि सायबर पोलिस ठाण्यातील एका कर्मचा-याला बाधा झाली होती. गेल्या दोन दिवसांपुर्वी पोलिस दलातील कोरोनाबाधित कर्मचा-यांची संख्या ४१ वर होती. आता आर्थिक गुन्हे शाखेतील कर्मचा-याला बाधा झाल्याने ही संख्या ४२ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना व इतर व्याधींनी औरंगाबादेत आतापर्यंत सव्वातीनशेवर बळी गेले असून, माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.
पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी समोर आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेत जंतूनाशक फवारणी करण्यात आली. त्याच्या संपर्कात असलेल्या एका सहायक पोलिस निरीक्षक व शिपायाला वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासात माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. हर्सुल, जटवाडा रोडवरील ५५ वर्षीय महिलेला ६ जुलैला घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ७ जुलैला पॉझिटीव्ह आला होता. त्यांचा त्याचदिवशी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला.
विहमांडवा (ता. पैठण) येथील ३२ वर्षीय पुरुषाला ४ जुलैला घाटीत भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ६ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा ७ जुलैला मृत्यू झाला. तर पडेगावातील एका माजी नगरसेवकाचा आज पहाटे चारच्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात घाटी रुग्णालयात २५०, विविध खासगी रुग्णालयात ७८, जिल्हा रुग्णालयात दोन अशा एकूण ३३० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात औरंगाबाद शहरातील १०० व ग्रामीण भागातील ६८ रुग्णांचा समावेश आहे. यात ९४ पुरूष व ७४ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७ हजार ३०२ कोरोनाबाधित आढळले. त्यातील ३ हजार ८२४ रुग्ण बरे झालेले असून, ३२९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ३ हजार १४९ जणांविरूध्द उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Leave a comment