औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात विनाकारण प्रवेश करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी आज दिला. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूवर 10 जुलै ते 18 जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यावरच सविस्तर माहिती देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. शहरात प्रवेश करताना आणि शहराबाहेर जाण्यासाठी पासधारकांनाच परवानगी राहील. त्यातही अत्यावश्यक कामांसाठी आणि शासकीय कामांकरिता ही परवानगी राहील. तसेच 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान शासकीय आणि अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कुणालाही बाइकवर सुद्धा बाहेर पडता येणार नाही. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सरकारी पेट्रोल पंपांवर आता केवळ शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा यासाठी परवानगी असलेल्या वाहनांनाच पेट्रोल आणि डीझेल भरता येईल. खासगी पेट्रोल पंपावर काही बंधने लावण्यासाठी चर्चा सुरू आहेत, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. बाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा अधिकारी आणि कर्मचारी शहरात कार्यरत राहतील. यासाठी 4 टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. जवळपास 400 अधिकारी आणि कर्मचारी 12 तास काम करतील. यात लॉकडाउन सुपरव्हायजर आणि इतर जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. हे टास्क फोर्सचे सदस्य विनाकारण बाहेर पडणार्यांना दंड लावणार आहेत. घराबाहेर पडणार्या नागरिकांचा तपास करण्यासाठी मनपा कर्मचार्यांसह पोलिस सुद्धा तैनात केले जात आहेत. नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे आणि घरातच राहावे अशी विनंती सुद्धा मनपा आयुक्तांनी यावेळी बोलताना केली आहे. दूध आणि न्यूज पेपर इत्यादी वाटपासाठी सकाळचे सत्र ठरवण्यात आले आहे. याच सत्रात दूध आणि पेपर टाकण्याची परवानगी राहील. कृषी बाजारपेठा आणि बँका सुद्धा यावेळी बंदच राहतील. केवळ शासकीय आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणार्यांनाच परवानगी दिली जाईल. दरम्यान, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संचारबंदी संदर्भात सोमवारीच आदेश जारी केले आहेत. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधी, पोलिस आणि प्रशासकीय अधिकार्यांमध्ये सोमवारी दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. याच बैठकीत उद्योजकांना देखील सामिल करण्यात आले होते.
Leave a comment