एक ही रुग्ण तपासणी आणि उपचारा विना वंचित राहत कामा नये-राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार
सोयगाव । वार्ताहर
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी कोविड 19 सद्य स्थिती तसेच शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोमवार दि.6 रोजी सोयगाव तालुक्याचा दौरा केला. प्रारंभी फर्दापूर येथे प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक घेत ना. अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील कोविड सेंटर ला भेट देऊन तेथील डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती , उपचार , डॉक्टर्स, नर्सेस इत्यादींचा असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड 19 लक्षणे नसलेल्या परंतु कोविड 19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवावे. कंटेन्मेंट केलेले झोन व होम कवॉरंटाईन केलेल्या रुग्णांनकडून नियमांचे पालन होते का हे तपासणे, तसेच सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील कोविड 19 रुग्णांची संख्या पाहाता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत कुणीही त्यापासून वंचित राहू नये, कुठलाही रुग्ण मग तो करोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याच्यावर उपचार झाला पाहिजे जर त्याच्यामध्ये कोरोनाचे लक्षण दिसत असल्यास त्वरित त्याची तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी केली जावी. मात्र कुठल्याही परिस्थितीत एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना परत जाता कामा नये याची दखल घेण्यात यावी असे निर्देश राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर येथील आढावा बैठकीत दिले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार प्रवीण पांडे सोयगाव, तहसीलदार रामेश्वर गोरे सिल्लोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे सिल्लोड ,नायब तहसीलदार विनोद करमणकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद टाकणखार, वैधकीय अधिकारी डॉ. शंकर कसबे ,यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे,सोयगाव शहर प्रमुख गजानन चौधरी, पंचायत समिती सभापती उस्मान खा पठाण,विलास वराडे आदींची उपस्थिती होती. पळसखेडा ता.सोयगाव येथे कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्याअनुषंगाने ना.अब्दुल सत्तार यांनी पळसखेडा येथे ही भेट दिली. सोयगाव तालुक्याला लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी केले . सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या काळात सर्दी, ताप या सारखे इतर आजार नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यातील साथ रोग व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने गावागावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी असे आवाहन ना. अब्दुल सत्तार यांनी पळसखेडा येथे केले.
Leave a comment