औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवस रात्र सर्वतोपरी प्रयत्न करत असून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे. त्यादृष्टीने 10 ते 18 जुलै दरम्यान लावण्यात येणार्या संचारबंदीचे कोटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी उदय चौधरी बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक ग्रामीण गणेश गावडे, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. नागनाथ कोडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासह संबंधित उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी 10 ते 18 जुलै दरम्यानच्या संचारबंदीत सरकारी कार्यालये 15 टक्के उपस्थितीवर सुरु राहतील. तसेच अग्नीशमन, पाणी, आरोग्य, सफाई यासह आवश्यक सेवांमधील सर्व सेवा सुरु राहतील. तसेच शहरा बाहेर, जिल्हयाबाहेर प्रवास करण्यासाठी पोलीस परवानगी (पास) आवश्यक राहील असे सांगितले. तसेच या संचारबंदीचा मुख्य उद्देश शहरातून ग्रामीण भागात होत असलेली रहदारी थांबवून कोरोनाची साखळी तोडणे हा आहे. हा संसर्ग तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंटेन्मेट झोनसह सर्व परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून अँटीजन्सी टेस्टींगसाठी किट वाटप करण्यात आले असून औरंगाबाद जिल्ह्याला 10 हजार किट मिळणार आहे. त्यामध्ये मनपाला 5 हजार आणि तालुक्याला 5 हजार किट वितरित करुन नियमानुसार या किटचा वापर करण्यात येईल. त्याद्वारे संशयितांच्या तपासण्या करण्यात येणार असून त्याचा तपासणी अहवाल अर्ध्या तासात उपलब्ध होतो, त्यामुळे सुरवातीला काही दिवस बाधीतांची संख्या अचानक वाढल्याचे दिसेल. मात्र, सद्य परिस्थितीत नमुना तपासणी अहवाल 24 तासानंतर प्राप्त होतो तो अर्ध्या तासात प्राप्त झाल्याने हा बदल दिसून येईल. तसेच शासनाकडे अँटीबॉडी टेस्टींगसाठी प्रशासनाने परवानगी मागितली असल्याचे, जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात प्रामुख्याने बाहेरुन आलेल्यामुळे संसर्ग झाला असून यंत्रणेच्या प्रयत्नांनी तो आटोक्यात येत आहे. वैजापूर, कन्नड, गंगापूर, सोयगाव या ठराविक मोठ्या तालुक्यांमधून वाढती रुग्ण संख्या कमी होत आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधीतांच्या संख्येपैकी 81 टक्के रुग्णसंख्या औरंगाबाद आणि गंगापूर या दोन तालुक्यात आहे. लवकरात लवकर रुग्णांचे निदान व्हावे, त्यांना आवश्यक उपचार सुविधा मिळावी यासाठी आरोग्य सुविधा तातडीने सक्षम केल्या आहेत. खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाच फक्त दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच खाजगी रुग्णालयांनी शासन दरानेच उपचार करणे बंधनकारक असून कमलनयन बजाज, एमजीएम, सेठ नंदलाल धुत, हेडगेवार या चार रुग्णालयात प्रशासनाच्यावतीने मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. कोरोना विषाणु हा दिवसागणिक त्याचे वर्तण स्वरुप बदलत असल्याने त्याला रोखणे आपल्या समोरचे मोठे आव्हान बनले आहे. त्यादृष्टीने कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. संसर्ग होणार नाही यासाठी खबरदारी घेत नियमांचे पालन करावेत. जेणेकरुन आपल्यासह सर्वांचाच जीव वाचवण्याची ही लढाई यशस्वी करु. जीव वाचवण्याला प्राधान्य देत विशिष्ट आरोग्य सुविधांसाठी दुराग्रही राहू नये. यंत्रणेला सहाकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देतांना डॉ. पाडळकर यांनी सांगितले, की या संचारबंदीच्या काळात शहरातील नगर नाका, केंब्रीज, हर्सुल इत्यादी टोल नाक्यांवर मनपातर्फे 4 बसेस मोबाईल पथकाद्वारे येणार्या प्रवाशांची तपासणी करुन रुग्ण निदान करणार आहेत. संबंधितांचे लाळेचे नमुने घेऊन तो अहवाल आल्यानंतरच त्यानुसार नागरिकांना घरी पाठवायचे की क्वॉरंटाईन करायचे हे ठरवल्या जाईल. सध्या शहरात 23 क्वॉरंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने काम करत असून गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येईल. संचारबंदीच्या काळात तपासण्या वाढवण्यात येणार असून संशयित रुग्णांना तातडीने लगेच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. तसेच विद्यापीठ येथील प्रयोगशाळेत नमुन तपासणीस सुरुवात झाली असून आज मनपातर्फे 50 नमुने पाठविण्यात आले असल्याचे डॉ.पाडळकर यांनी सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करणे गरजेचे असून नियम तोडणार्यांवर शहर तसेच ग्रामीण पोलीसांमार्फत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक ग्रामीण गणेश गावडे यांनी सांगितले.
Leave a comment