औरंगाबाद । वार्ताहर
बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकर्यांच्या बैल-जोडी चोरणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सदर ठिकाणाहून एक बैलजोडी व एक पिकअप असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रसूल पठाण यांनी 17 जून रोजी तक्रार दिली की, त्यांच्या पैठणखेडा शिवारातील शेतातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बैलजोडी चोरून नेली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रफिक हसन कुरेशी व त्याच्या साथीदारांनी केला आहे.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ रफिक कुरेशी यांच्या वाड्याची पंचासक्षम पाहणी केली असता त्या ठिकाणी फिर्यादी शेतकर्याची बैलजोडी व गुन्ह्यात वापरलेले पिकअप आढळून आले.पोलिसांनी बैलजोडी व पिकअप हस्तगत केले आहे. मात्र सदर गुन्ह्यातील आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत असून त्यांच्याकडून आणखीही जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Leave a comment