कोरोनाने औरंगाबादमध्ये घेतला सात जणांचा बळी
रुग्णांची संख्य 105 वर पोहचली
औरंगाबाद । वार्ताहर
दिवसेंदिवस मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे. काल सायंकाळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे किलेअर्क परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
किलेअर्क येथील 77 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेला रात्री दीड वाजता घाटीत आणण्यात आले. निवासी डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. महिलेच्या घरासमोरील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या महिलेच्या घरातील सर्वांना अलगिकरण कक्षात हलवण्यात आले होते. मृत्यू जाहीर केल्यावर डॉक्टरांनी संशयित म्हणून स्वॅब घेतला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे घाटीचे उप अधिष्ठाता डॉ.कैलास झिने यांनी सांगितले.त्यामुळे शहरातील कोरोना मृत्यूचा आकडा सात वर पोहचला आहे.आता महापालिका आणि पोलिसांना कळवुन मृतदेह नातेवाईकांना देण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे म्हणाले.
आतापर्यंत औरंगाबाद शहरामध्ये जे 7 कोरोनाग्रस्त मृत्यू पावले आहेत त्यामध्ये दर तीन दिवसाला एकाचा मृत्यू झाला आहे. 5 एप्रिल रोजी सातारा परिसरातील 58 वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू, 14 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 68 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, 18 एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू, 22 एप्रिलला आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू, 27 एप्रिलला किलेअर्क भागातील 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. शहरामध्ये 105 रुग्णांवर आयसोलेशन वार्डात उपचार सुरु असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली आहे.
Leave a comment