परतुरचे शेतकरी भास्कर सातोनकर यांचा यशस्वी प्रयोग
परतूर । वार्ताहर
कापूस पीक काढून त्याच जमिनीत उन्हाळी बाजरीचा धाडशी प्रयोग यशस्वी करणारे परतुर चे शेतकरी भास्कर सातोनकर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत. बाजरी हे खरिपात येणारे पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी उन्हाळी बाजरी पिकाच्या फ़ंद्यात पडलेला नव्हता, पण अलीकडे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेत चांगले उत्पन्न काढू लागल्याने आपल्याकडेही हा प्रयोग करून पहावा म्हणून परतुर चे प्रगतशील शेतकरी भास्कर सातोनकर यांनी आपल्या परतुर सेलू रोडवरील शेतात 3 एकरवर उन्हाळी बाजरीचा प्रयोग केला. कापूस पीक निघाल्यानंतर त्यांनी ठिबकसिंचन वर बाजरीची लागवड फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात केली. कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता केवळ शेणखत वापर केला.
आज जोमदार उन्हाळी बाजरीचे पीक पाहून परिसरातील अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.एक एक फूट लांबीची टपोरे दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हे उन्हाळी बाजरीचे पीक सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता,औषध फवारणी न करता केवळ अडीच महिन्यात एकरी 20 क्विंटल उत्पादन होईल असा विश्वास भास्कर सातोनकर यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलुन दाखवला.उन्हाळी बाजरीला उत्तम भावा सोबत जनावरांसाठी पालेदार चारा ही मिळणार असल्याने सातोनकर या बाजरी पिकाने चांगलेच समाधानी आहेत. कापूस काढून अनेकांनी टरबूज खरबूज किंवा भाजीपाला घेतला त्या शेतकर्यांची कोरोना च्या लॉकडाऊन ने पार वाट लागली. अशावेळी उन्हाळी बाजरीचे पीक घेत सातोनकर यांनी केलेला हा प्रयोग शेतकरी वर्गासाठी आशेचा किरण ठरणारा दिसत आहे, त्यामुळे पुढच्या हंगामात उन्हाळी बाजरीच्या पिकांकडे शेतकर्यांचा कल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Leave a comment