औरंगाबाद । वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सहा जणांची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे या सहा जणांना आज कोरोनामुक्त झाल्याने मिनी घाटीतून डिस्चार्ज देण्यात आला. तर दुपारी भीमनगर येथील 27 आणि आसेफिया कॉलनीतील 38 वर्षीय पुरूष रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची आतापर्यंतची संख्या 42 झाली आहे. सध्या मिनी घाटीत एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत दोन अशा एकूण 15 कोरोनाबाधितांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
मिनी घाटीत आज एकूण 113 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 62 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. तर 136 जणांचे स्वॅब घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. 81 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर 56 जणांचे येणे बाकी आहेत. सध्या मिनी घाटीत 75 जण भरती असून 81 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आलेले आहे. आतापर्यंत 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात मिनी घाटीतून 20 आणि खासगी रुग्णालयातून दोन रुग्णांचा समावेश आहे. पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असेही श्री. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत 25 रुग्णांची तपासणी
घाटीत मागील चोविस तासात दुपारी चार वाजेपर्यंत 25 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी चार जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रूग्णालयात समता नगरातील 38 आणि 51 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह पुरूष रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णालयात एकूण 24 रुग्ण भरती आहेत. मागील चोविस तासात घाटी रुग्णलयात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
Leave a comment