रेशनकार्ड नसलेल्या गरजूंना ही धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे
शासकीय कामे सुरू केल्यास बेरोजगारांच्या हाताला मिळेल काम
सिल्लोड । वार्ताहर
रेशनच्या लाभधारकांना नियमानुसार धान्य मिळत आहेत. मात्र काही गरजू कुटुंबाकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे रेशनकार्ड नसल्याने गरजू कुटुंबांना शासनाच्या वतीने धान्य देणे गरजेचे असून शासकीय कामे सुरू केल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, कापूस उत्पादक शेतकर्यांना धीर देण्यासाठी त्वरित शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशा विविध उपाययोजना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सुचविल्या.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून जिल्ह्यातील आमदारांची मते जाणून घेतली. याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी विविध विषयांवर चर्चा करीत असतांना सामान्य जनतेला आधार देण्यासाठी विविध उपाययोजना विषयी आपले मत व्यक्त केले. कोरोनाचा आढावा देत असतांना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोड सोयगाव मतदार संघामध्ये पोलीस व महसूल विभाग लॉक डाऊन तसेच जिल्हाबंदीचे काटेकोरपणे अमलबजावणी करीत आहे. सुदैवाने सिल्लोड- सोयगाव मतदार संघात आतापर्यंत कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. औरंगाबाद ग्रामीण मध्ये कोरोनाचा शिरकाव नाही. मतदार संघातील सोयगाव तालूका अतिदुर्गम भाग असून औरंगाबाद पासून 120 किमी दूर आहे. शिवाय मतदार संघात औधोगिक क्षेत्र नसल्याने बहुतांशी कामगार हे बांधकाम करणारे आहेत. लॉक डाऊन मध्ये बांधकाम बंद असल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. मतदार संघात तांत्रिक अडचणींमुळे वाळूचे टेंडर झालेले नाही. शासकीय कामे यामुळे प्रलंबित आहेत. किमान शासकीय कामांसाठी नियमाप्रमाणे महसूल जमा करून वाळू उपलब्ध करून देवून सोशल डिस्टनसिंग चे नियमांचे पालन करीत शासकीय कामे सुरू केल्यास लोकांच्या हाताला काम मिळेल असे ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
Leave a comment