जालना । वार्ताहर
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त अशा 150 खाटांची क्षमता असलेल्या व केवळ 29 दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना हॉस्पीटलचा शुभारंभ फित कापुन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु जिल्ह्यात या विषाणुमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीकोनातुन या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी 100 खाटा व 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष असुन या ठिकाणी 50 व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती तसेच विविध संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपी किट तसेच ट्रीपल मास्क, एन-95 मास्कही उपलब्ध करुन देण्यात आले असुन गरजुंना उपचारासाठी प्रभावी ठरणार्या टेलिमेडीसनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आली असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली. सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना सॅनिटायजर, मास्क तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती पुस्तिका यांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातुन जिल्हा रुग्णालयासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुनही निधी मिळण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली. हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर श्री. टोपे यांनी संपूर्ण कोरोना हॉस्पीटलची पाहणी केली.
कोरोना उपचारासाठी पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला मंजुरी
कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली असल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती देत ज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
Leave a comment