त्या महिलेची प्रकृती स्थिर
परतूर । वार्ताहर
तालुक्यातील शिरोडा येथील एका 39 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर यांनी आज बुधवारी सदर गावाला भेट दिली. वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशासेवीका आदी कर्मचार्यांचा समावेश असलेल्या दोन आरोग्य पथकामार्फत गावातील 80 कुटुंबातील 560 ग्रामस्थांचे सर्वेक्षण करण्याचे काम आज हाती घेण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या या महिलेची पार्श्वभूमी अशी आहे की, ताप, सर्दी, खोकला येत असल्याने तिने प्रारंभी गावातच उपचार घेतले मात्र काहीच परिणाम न झाल्यामुळे जालन्यातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दि.10 ते 13 एप्रिल या कालावधीत उपचार घेतला मात्र तेथे देखील प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्यामुळे सदर महिलेला 13 एप्रिल रोजी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सदर महिलेच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते.
या बाबतचा 14 एप्रिल रोजी प्राप्त अहवाल निगेटिव्ह आढळून आला होता मात्र याच महिलेच्या लाळेचे नमुने घेऊन ते 20 एप्रिल रोजी पुन्हा प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्याबाबत काल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यासर्व पार्श्वभूमीवर सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या 49 लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यात जालन्यातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टर सह कर्मचारी आणि गावाकडील नातेवाईक व जवळच्या लोकांचा समावेश असून आतापर्यंत 19 जणांना जिल्हा सरकारी रुग्णालयात विलगिकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत असून ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली. उर्वरित लोकांना लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ.राठोड यांनी सांगितले.
Leave a comment