स्थानिक डॉक्टरांची भुमिका महत्वाची
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि महसूल प्रशासनाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना आणखी प्रभावीरित्या राबवून कोवीड 19 चा संसर्ग रोखावा. संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यावर आणि गर्दी टाळण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, प्रतिबंधात्मक आवश्यक त्या उपाययोजनांसाठी लागणारा निधी पालिकेला उपलब्ध करुन दिला जाणार असून जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका या दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधत प्रभावीपणे काम करावे असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना उपाययोजनांबाबत महसूल यंत्रणा आणि महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचा आढावा विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी घेतला, त्यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगर पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, अपर शासकीय वैदयकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्या सह संबंधित उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर सूचना करताना म्हणाले की, शहरात आरोग्य तपासणी विना अडथळा होण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करण्याकरीता नगरसेवकांना विश्वासात घेऊन परिसरातील जबाबदार नागरिकांचे पथक स्थापन करावे. मनपाच्या अधिकार्यांना शहरातील विविध भाग वाटून देऊन आशा वर्करमार्फत संशयित रुग्णांचा शोध घ्यावा. लाळेचे नमुने घेण्यासाठी टीमच्या संख्येत वाढ करावी. अतिरिक्त स्टाफसाठी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकार्य घ्यावे. शहराच्या विविध भागात फीवर क्लिनकचे शिबीरं आयोजित करावेत. चेकपोस्ट येथे समुपदेशन तथा स्वॅब घेण्याचे युनिट सुरु करावे. प्रसार माध्यमांमधून जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी विभागीय आयुक्तांनी दिल्या. जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, रेशन दुकानांमार्फंत देण्यात येत असलेल्या धान्याची माहिती अशा विविध बाबींविषयी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी विभागीय आयुक्त यांना माहिती दिली. आपतकालीन वेबसाईट लोकांसाठी सुरु करण्यात आली असून त्याचा वापर लोकांकडुन केल्या जात असल्याचे सांगून मनपा आयुक्त श्री.पांडेय यांनी पालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासकीय वैदयकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि औषध विभागप्रमुख डॉ.भट्टाचार्य यांनी ज्या भागात कोरोनाच रुगण आढळले त्या भागात जाऊन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधुन त्यांचे स्वॅब गोळा करावे, या कामात महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
Leave a comment