जालना । वार्ताहर
जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व दुधविक्री, ङ्गळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, घरगुती गॅस व औषधी दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच सुरु ठेवावीत. या व्यतिरिक्त ईतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत. कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये संचारबंदीमुळे जालना जिल्ह्यातील अडकलेल्या ऊसतोडणी मजुर व ऊस वाहतुक करणारे कामगार व त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार मजुर ज्या जिल्ह्यात कामगार म्हणून काम करत आहेत तेथील जिल्हाधिकार्यांनी प्रस्तावास मान्यता दिल्याच्या पत्राची प्रत त्यांना जालना जिल्ह्यात प्रवेशासाठी आवश्यक राहील. तसेच मान्यतेसोबत कामगारांचे त्यांच्या निवासी पत्त्यासह, गाव, तालुका व जिल्हानिहाय यादी, संबंधित कामगारांच्या गावातील सरपंचाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक याचा उल्लेख असावा. ज्या वाहनातुन कामगार प्रवास करणार आहेत त्या वाहनांची रीतसर परवानगी पत्र, कामगारांच्या वाहतुकीबाबत आवश्यक ते परवाने घेण्याची कार्यवाही करण्याबरोबर कामागारांना प्रवासामध्ये भोजन, पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची जबाबदारी संबंधित कारखान्यांची राहणार आहे.
कामगारांना घेऊन वाहने जालना जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यानंतर पोलीस विभागाने येणार्या वाहनांची चेकपोस्टवर संपुर्ण कागदपत्रांची व यादीतील व्यक्तींची तपासणी करावी. तसेच यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. चेकपोस्टच्या ठिकाणी पोलीस विभाग संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामगारांची तपासणी करेल. कामगार गावात आल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांनी त्यांना वेगळे ठेवण्यासाठी योग्य अशी जागा निवडावी व आरोग्य विभागाच्या मदतीने संबंधित कामगारांना 14 दिवस क्वारंटाईन करावे. तसेच मुळ गावी पोहोचल्यानंतर कामगारांचा गावप्रवेश, कामगार मुळगावी पोहोचल्याचे प्रमाणपत्र संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे बंधनकारक राहील. तालुका आरोग्य अधिकारी हे संबंधित कामगारांची सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने 14 दिवस क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करतील व त्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करतील. पथकाने त्या कामगारांची 14 दिवस दररोज भेट देऊन तपासणी करावी व अहवाल नियमितपणे जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्याचे आदेशही जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत. वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत. या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 302 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 304 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 302 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 766 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 20 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 544 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 515, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 91, एकुण प्रलंबित नमुने-22 तर एकुण 411 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 89, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 27, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -302, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 38, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
Leave a comment